नवी मुंबई : नवी मुंबई पालिका हद्दीत नव्याने लागू केलेली टाळेबंदी सोमवार, १३ जुलैच्या मध्यरात्री संपुष्टात आल्यानंतर पालिकेने पुन्हा दहा दिवसांची टाळेबंदी लागू केली आहे. ती १९ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे. टाळेबंदीच्या ११ दिवसांत २, ५९० रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी टाळेबंदी हा उपाय आहे का, असा सवाल  उपस्थित केला जात आहे.

टाळेबंदीमुळे आर्थिक चक्र रुतत चालले आहे. यावर शासनाने कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळे टाळेबंदीचा निर्णय घेण्याआधी सरकारने विचार करावा, अशी मागणी नागरिक आणि लघुउद्योजकांकडून केली जात आहे.

नव्या टाळेबंदीच्या दहा  दिवसांतील रुग्णांचा आकडा  झपाटय़ाने वाढला आहे.

सरासरी दिवसाकाठी २०० हून अधिक रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे दहा दिवसांत २,५९० रुग्ण वाढलेले आहेत. नवी मुंबईत बाधितांची एकूण संख्या ९,६७८ झाली आहे. आजवर करोनामुळे ३०५ जणांचा मृत्यू झाला आहे. टाळेबंदीत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसी व अत्यावश्यक सेवा वगळता  शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत.

शहरात विविध उपनगरात भाजी घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळते. तर रस्त्यावरही गाडय़ांची वर्दळ पाहायला मिळाली.

नव्या टाळेबंदीतील रुग्ण

३ जुलै—       २५७

४ जुलै— २५७

५ जुलै— १९१

६ जुलै— १६४

७ जुलै— ११५

८ जुलै—       २०७

९ जुलै— २३९

१० जुलै—      ३६१

११ जुलै—२५३

१२ जुलै—      ३१३

१३ जुलै— २३३

करोना रोखण्यासाठी टाळेबंदी हा उपायच नसल्याचे आकडेवारीवरुन दिसते. त्यामुळे संपूर्ण नागरीक आर्थिक संकटात अडकला आहे.व्यवसाय बंद असल्याने मोठय़ा आर्थिक अडचणींचा सामना कराना लागत आहे. सामान्य माणसाने जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-संतोष चौधरी, व्यावसायिक