नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या १९ हजार पार झाली आहे. शहरात मंगळवारी २७८ नवे करोनाबधित रुग्ण आढळले असून करोनाबाधितांच्या संख्येत दररोज चिंताजनक वाढ होत आहे. याचसोबत शहरातील मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य विभागापुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १९,०३३ झाली आहे. शहरात मंगळवारी ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ४७८ झाली आहे.

शहरात आतापर्यत एकूण १५,१७३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शहरात ३,३८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत असून शहरात आतापर्यंत ३७ हजार ९८० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. करोनामुक्तीचा दर ८० टक्केपर्यंत पोहोचला आहे.  नवी मुंबईत एकूण ७५,३२७ नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.