३ ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या दोन हजार ८५५

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : करोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) आवार हे करोनाचा स्त्रोत म्हणून गणले जात होते. आजही ‘एपीएमसी’वर पालिका यंत्रणेचा अधिक भर आहे. अर्थात या आवारात अत्यावश्यक सेवेअंतर्गत भाजीपाला आणि दाणा बाजारात काम करणारे माथाडी कामगार आणि मापारी  हे कोपरखैरणेमध्ये राहत असल्याने सुरुवातीला या भागात करोनारुग्णांचा आकडा जास्त होता. आता यात कोपरखैरणे मागे पडून नेरुळ आघाडीवर असल्याचे पालिकेच्या आकडेवरून स्पष्ट झाले आहे. नेरुळमध्ये ३ ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या दोन हजार ८५५ पर्यंत पोहोचली. कोपरखैरणेत सध्या  दोन हजार ८२१ रुग्ण आढळले आहेत.

मात्र, नेरुळमधील रुग्णसंख्या नेमकी कशामुळे वाढली याचे कारण पालिका प्रशासन देऊ शकलेले नाही.

प्रतिजन चाचण्यांमध्ये वाढ झाल्याने रुग्णसंख्या अधिक दिसत असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. तरीही प्रसार रोखण्यामागची कारणे अद्याप सापडलेली नाहीत.

प्रतिजन चाचण्यांमध्ये वाढ झाल्याने नवी मुंबईतील रुग्णांचा आकडा ३००च्या आसपास आहे. ३१ जुलै रोजी नोंदलेली ३९८ ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

कोपरखैरणेत सुरुवातीच्या काही दिवसांचा अपवाद वगळता कोपरखैरणेत सर्वाधिक रुग्णसंख्या होती. मात्र, गेल्या आठवडय़ात नेरुळमध्ये मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळून आले असून कोपरखैरणेला मागे टाकले आहे. कोपरखैरणेत रोजच्या संख्येत ५०ने भर पडत आहे.

दिघ्यात सर्वाधिक कमी रुग्ण

नवी मुंबईतील मोठी झोपडपट्टी असलेल्या दिघ्यात आजवर कमी रुग्णसंख्या आहे. दाट लोकवस्ती असूनही आजवर दिघ्यातील करोना प्रादुर्भाव धोकादायक पातळीपर्यंत वाढलेला नाही. याच वेळी तुर्भे झोपडपट्टी भागात जून महिन्यांत मोठय़ा प्रमाणावर  संसर्ग वाढला होता. मात्र, पालिका यंत्रणा, सामाजिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे येथील रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. यानंतर नवी मुंबईत इतरत्र तुर्भेचा कित्ता कायम ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला.

आजवर करोना

नवी मुंबईत आजवर १६ हजार ४२६ रुग्ण आढळून आले आहे. यापैकी ११ हजार १६१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. चार हजार ८३१ रुग्ण उपचाराधीन आहेत.  आजवर ४३४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ६५ टक्क्य़ांहून अधिक मृत्यू हे ज्येष्ठ नागरिकांचे आहेत. अन्य मृत्यू हे विविध दुर्धर आजाराशी अगोदरच झुंज देणाऱ्यांचे आहेत. करोनामुक्तीचे प्रमाण हे  ६७ टक्क्य़ांपर्यंत पोचले आहे.

नोडनिहाय स्थिती

२८ मार्च ते २९ जुलै

ऐरोली : २,२०४

बेलापूर :१,६७४

दिघा : ७२९

घणसोली : १९८५

कोपरखैरणे  : २५१७

नेरुळ :२४३४

तुर्भे : १७३६

वाशी : १३४८

एकूण : १४,६२७

३० जुलै ते ३ ऑगस्ट

बेलापूर :२४३

नेरुळ : ४२१

वाशी : २०९

तुर्भे : १२६

कोपरखैरणे : ३०४

घणसोली : २५३

ऐरोली : २०६

दिघा : ३७

एकूण : १, ७९९

२८ मार्च ते ३ ऑगस्ट

बेलापूर : १९१७

ऐरोली : २४१०

नेरुळ : २८५५

वाशी : १५५७

तुर्भे : १८६२

कोपरखैरणे : २८२१

घणसोली : २२३८

दिघा : ७६६

एकूण : १६,४२६