नवी मुंबई : कुर्ला येथील गांधी बाल मंदिर हायस्कूलमध्ये शिक्षक असणारे अनिल पांचाळ हे त्यांची शालेय व्यवस्थापन अभ्यासक्रमाची परीक्षा संपल्यानंतर बुधवारी संगमेश्वरजवळील आंबिवली येथे येणार होते. येथून मुले आणि कुटुंबासमवेत सिंधुदुर्ग, गगनबावडा येथे सहलीला जाण्याचे त्यांनी नियोजन केले होते. परंतु त्यांचे सहलीचे स्वप्न स्वप्नच राहिले.

आंबवली गावाजवळील सप्तलिंगी नदीत महाकालीच्या डोहामध्ये पोहायला गेलेला त्यांचा भाऊ, मुलगा आणि पुतण्या अशा तिघांचा बुडून मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुखाचा डोंगरच कोसळला. कुटुंबासमवेत सिंधुदुर्ग, गगनबावडा येथे सहलीला जाण्याचे त्यांनी नियोजन केले होते, परंतु या दुर्घटनेने त्यांचे सहलीचे स्वप्न स्वप्नच राहिले.

पांचाळ कुटुंब नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर २३ येथील शिव अपार्टमेंट सोसायटीत राहत होते. उन्हाळी सुट्टीनिमित्त आपल्या मूळ गावी गेले होते. तेथे डोहात अंघोळीसाठी उतरताना डोहाच्या खोलीचा अंदाज नसल्याने एकमेकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्नात जनार्दन संभाजी पांचाळ (४३), रोशन जनार्दन पांचाळ (१४) आणि ओंकार अनिल पांचाळ (१६) या तिघांचाही बुडून मृत्यू झाला.

संगमेश्वरमधील ग्रामस्थांना हे तिघे बुडाल्याची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली होती. पोलीस व ग्रामस्थांनी तिघांना बाहेर काढून संगमेश्वररुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच या तिघांचा मृत्यू झाला.

जनार्दन पांचाळ हे दादर येथील शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. ओमकार अनिल पांचाळ याने दहावीची परीक्षा दिली होती. तर जनार्दन पांचाळ यांचा मुलगा नववीत गेला होता. कुटुंब प्रमुख असलेले अनिल पांचाळ सोमवारी रात्री उशिरा आंबवलीत पोहोचल्यावर या तिघांवरही आंबवली येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले.

पांचाळ कुटुंबातील तिघे जण अनपेक्षितपणे गेल्याने त्यांच्या कुटुंबावर कोसळलेला दु:खद प्रसंग आ़णि कुटुंबीयांचा आक्रोश गावकऱ्यांचे मन हेलावून टाकत होता.