गेली चार वर्षे पालिकेत समाविष्ट होऊनही विकासकामे होत नसल्याने ‘आमची ग्रामपंचायतच बरी’ असा सूर लावलेल्या ३० गावांचे मूलभूत प्रश्न आता मार्गी लागणार आहेत. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या गावे व पाडय़ांसाठी ३० कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून यातून काँक्रीटचे रस्ते, मलनिस्सारण, सांडपाणी वहनासाठी गटारे, स्मशानभूमी दुरुस्ती, समाजमंदिर आदी कामे करण्यात येणार आहेत.
पालिका स्थापनेपासून पालिका ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधी बाकांवरील शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य व नागरिकांकडून केला जात होता. तसेच ग्रामस्थही नाराजी व्यक्त करीत होते. गावांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत होता, ‘स्मार्ट व्हीलेज’ योजनेअंतर्गत पालिकेने धानसर, रोडपाली, करवले, कोयनावेळे या चारगावांसाठी ३८ कोटी रुपयांचे नियोजन केले आहे. मात्र याच गावांना प्राधान्य का? असा प्रश्न इतर गावांतील ग्रामस्थ विचारत होते. त्यामुळे ग्रामस्थांची ही नाराजी पुढील निवडणुकीत अडचणीचे ठरणार असल्याने तसेच मालमत्ताकराला होत असलेला विरोध पाहता सत्ताधारी भाजपने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
पालिका प्रशासनाने यावर्षी पालिकेत समाविष्ठ गावे व सिडको वसाहतींना मालमत्ता कराच्या नोटीसा देणे सुरू केले आहे. या कराला सिडको वसाहतींसह गावांतून विरोध होत आहे. गावात कामेच होत नसल्याने मालमत्ता कर का भरायचा असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. याचा राजकीय फायदा घेण्यासाठी शेकाप व महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतील नेत्यांनी ग्रामीण भागात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. हा विरोध मावळण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याची चर्चा सुरू आहे.
सल्लागार कंपन्यांविषयी नाराजी
सर्वसाधारण सभेत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख हे गैरहजर होते. मात्र सदस्यांनी आयुक्त देशमुख यांच्यासह विठ्ठल डाके , शहर अभियंता संजय कटेकर यांच्या कामाचे यावेळी कौतुक केले. तसेच बांधकाम विभागासाठी सल्लागार नेमलेल्सहा कंपन्यांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. यातील अनेक कंपन्यांचे काम संथगतीने होत असून यामुळे अनेक प्रकल्प रखडत असल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले. तसेच बांधकामाच्या ठिकाणी वेळीच हजेरी न लावल्याने अनेक गैरप्रकारही होत असल्याचा आरोप केला.
गावांसाठी विकास निधी
रोहींजन (७०,४८,१५८), तुर्भे (९९,५८,७६२), धरणाकॅम्प (४७,२०,०५१), पापडीचापाडा (३२,३५,३२२), खुटूकबांधण (२४,२४,८२७), खुटारी (१,२७,६०,९५८), एकटपाडा (६५,९६,४०४), पडघे (५०,८२,२९१), आडिवली किरवली (४५,६३,२०१), ईनामपुरी (२२,२१,८०४), तोंडरे (९२,३८,४३४), नागझरी (८५,६४,३०९), कोपरा (१,१२,७२,८९१), ओवे (९५,५२,७३१), पेणधर (१,१५,३,६१४), धरणा (८३,७०,७४९), पेठ (१४,७८,३२१), तळोजा मजकूर (२६,८४,१३७), घोट (५१,१३,०९०),धामोळे (११,८७,४४३), खिडुकपाडा(१,३७,४८,७८१), वळवली (१,३५,७०,६३२), टेंभोडे (९२,६६,३८७), आसूडगाव (३,१०,४१,७६०), कळंबोली (१,५८,३४,६०६), रोडपाली (६३,८७,२६३) तसेच काळुंद्रे, भिंगारी, तक्का व पोदी येथे ८ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 12:07 am