पनवेल : तालुक्यातील मोरबे गावामध्ये कचरा जमा होणाऱ्या जागेवर विषारीमांस खाल्याने सूमारे ३० श्वान मृत्यूमुखी पडल्याने खळबळ उडाली. पशूप्रेमींनी ही घटना उघडकीस आणली असून तीन दिवसांपूर्वी गावात ठिकठिकाणी मृत श्वान आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. यामध्ये अनेक श्वान आदिवासी बांधवांनी पाळलेले होते.

मोरबे गावातील जलकुंभाजवळ आदिवासी वाडी आहे. याच येथे भटके श्वान वावरत होते. मात्र मागील आठवडय़ात गुरुवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये अनेक भटके श्वान मृत पडल्याचे दिसल्याने अनेक पशुप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. कचरा जमा होणारी एक जागा गावाबाहेर आहे. येथे एक खड्डय़ात अनोळखी व्यक्तीने मांस टाकले होते. हेच मांस खाल्याने श्वानांचा मृत्यू झाल्याचे येथील आदिवासी तरुणाने सांगितले.

 

रात्रगस्तीची मागणी

काही पशूप्रेमींपैकी नवीन पनवेल पोलीस ठाण्यात श्वानांच्या मृत्यू प्रकरणांचा शोध घेण्याची विनंती केली असून रात्रीच्यावेळी पोलीसांनी गावात गस्त वाढविण्याची मागणी पशुप्रेमींनी केली आहे. नेमके हे श्वान कोणाला अडसर ठरत होते, असा सवाल केला जात आहे.