३८ लाख ८० हजार रूपयांची दंडात्मक कारवाई

नवी मुंबई राज्य सरकारने मार्च २०१८ पासून प्लास्टिकवर बंदी घालत कडक अंमलबजावणी केली. याला वर्ष झाले असून वर्षभरात नवी मुंबई पालिकेच्या वतीने केलेल्या कारवाईत शहरातून ३० टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

शासनाने बंदी घालण्याअगोदरच नवी मुंबई महापालिकेने शहर प्लास्टिक मुक्तीसाठी पावले उचलली होती. मार्च २०१८ मध्ये राज्यात प्लास्टिकबंदीचा अध्यादेश काढल्यानंतर प्लास्टिक पिशवी, थर्माकोलच्या वस्तू वापरावर बंदी आणण्यात आली. त्यामुळे पालिकेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मार्च २०१८ मध्ये ते डिसेंबर २०१८ पर्यंत ७२८ व्यापारी व दुकानदारांवर कारवाई करून एकूण २८ टन प्लास्टिक जप्त केले. ३४ लाख दंडवसुली करण्यात आली होती. २०१९ मध्ये  जानेवारी, फेब्रुवारीमध्ये एकूण ४ लाख ८० हजार दंडवसुली करण्यात आली असून दीड टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

बेलापूर विभागातून ९५ हजार रुपये, नेरुळमधून ६० हजार रुपये, वाशीतून १ लाख ६० हजार रुपये, तुर्भेतून ७५ हजार रुपये, कोपरखैरणे येथून ४० हजार रुपये, घणसोलीमधून ९४ हजार रुपये, ऐरोलीमधून ३५ हजार रुपये तर दिघ्यातून १० हजार रुपये असे वर्षभरात एकूण ३८ लाख  ८० हजार रुपये दंडवसुली करण्यात आली असून ३० टन प्लास्टिक जप्त केले आहे.

प्लास्टिकमुक्तीच्या वाटचालीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. महिती फलक, पथनाटय़, मार्गदर्शन करून प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती केली जात असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.