30 September 2020

News Flash

करंजा चाणजे परिसरातील तीनशे एकरमध्ये ‘खारे’पाणी

शेतकऱ्यांना मिळालेल्या सुमारे ३०० एकर जमिनीत खारे पाणी शिरत असल्याने ती नापीक होण्याच्या मार्गावर आहे

करंजा चाणजे खाडीवर बांधलेली बांधबंदिस्ती नादुरुस्त असल्याने खारेपाणी शेतजमीनीत शिरत आहे.

शेती नष्ट; बांधबंदिस्तीची शेतकऱ्यांची मागणी

जगदिश तांडेल, उरण :

करंजा चाणजे खाडी परिसरातील कुळकायद्याने शेतकऱ्यांना मिळालेल्या सुमारे ३०० एकर जमिनीत खारे पाणी शिरत असल्याने ती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. बांधबंदिस्ती नादुरुस्त झाल्याने समुद्राची पातळी वाढली की पाणी जमिनीत शिरत आहे.

ही जमीन वाचविण्यासाठी चाणजे शेतकरी संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे. कांदळवन संरक्षण विभाग, सिडको तसेच प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी समितीने केली असून तसे न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

समुद्राच्या पाण्यापासून शेतजमिनीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी बांधबंदिस्ती केली जाते. तसेच भरती-ओहटीच्या पाण्याचा निचरासाठीही उपाययोजना केल्या जातात. मात्र १९७० पासून शासन व सिडकोकडून  करंजा चाणजे परिसरातील या शेतकऱ्यांच्या जमिनीकडे दुर्लक्ष होत आहे. येथील समुद्राची पातळी वाढली की ही शेती समुद्राच्या पाण्याखाली जात आहे. १९९५-९६ ला सिडकोकडून करंजा खाडीवर बांधण्यात आलेली बंदिस्ती तुटल्याने संपूर्ण शेतीच समुद्राच्या पाण्याखाली जाऊन ती नष्ट झाली आहे. या संदर्भात वारंवार माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ३०० एकर नापीक होण्याच्या मार्गावर असल्याचे चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी सांगितले.

येथील दोनशे शेतकऱ्यांची ३०० एकर जमीन वाचवून ती पिकविता यावी याकरिता मदत म्हणून येथील बंदिस्ती मजबूत करून येथील मोऱ्यांना झाकणे लावावीत, जेणे करून समुद्राच्या भरती ओहटीच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसे न केल्यास शेतकरी चाणजे संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ही जमीन आमचे भविष्य

आमच्या वाडवडिलांनी समुद्रावर मात करून ही शेती निर्माण केली. त्यामुळे आमच्या अनेक पिढय़ा जगल्या आहेत. मात्र सध्या समुद्रच शेतीत शिरू लागल्याने आमच्या हयातीत ही शेती संपुष्टात येऊ लागली असल्याची खंत करंजा येथील इंदूबाई गोविंद म्हात्रे या शेतकरी महिलेने व्यक्त केली. तर सिडकोने विकासाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर शेती नष्ट करण्याच्या मार्गाचा अवलंब केल्याचा फटका आम्हाला बसत असल्याचे ज्येष्ठ शेतकरी दत्तू नारायण भोईर यांनी सांगितले. तर ही जमीन म्हणजे आमचे भविष्य असल्याने ती वाचविण्याची गरज असल्याचे अजित म्हात्रे यांनी व्यक्त केले.

ही जमीन वाचविण्यासाठी सिडकोकडून उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये भरतीचे पाणी थांबविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या झाकणांमुळे कांदळवनाला पाणी मिळत नसल्याने ही झाकणे न्यायालयाच्या आदेशानंतर काढण्यात आली आहेत.

– अनिल रसाळ, कार्यकारी अधिकारी, सिडकोच्या द्रोणागिरी नोड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 1:44 am

Web Title: 300 acres saltwater land given to farmers
Next Stories
1 आईच्या ओढीने व्याकूळ बाळाचा घरात मृत्यू
2 वाहन चोरटय़ांची नवीन शक्कल
3 लॉजमध्ये महिलेची हत्या करणाऱ्यास अटक
Just Now!
X