नवी मुंबईत करोना बाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही दररोज वाढत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात गुरुवारी ३३० नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार ५९९ इतकी झाली आहे. शहरात आज  ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ३६५ झाली आहे.  शहरात आतापर्यत तब्बल ८,१३६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ४ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असून पालिकेने मिशन ‘ब्रेक द चेन’ ची मोहिम सुरू केली आहे.

दरम्यान, नवी मुंबईत शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने येत्या काळात शहरातील कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) आणि अतिदक्षता खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अतिदक्षता विभागातील ४०० अतिरीक्त खाटा, १६० कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि दिवसाला एक हजापर्यंत चाचण्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

सध्या शहरातील रुग्णालयांमध्ये मिळून २४५ अतिदक्षता खाटा ८७ कृत्रिम श्वसन यंत्रणा कार्यान्वित आहेत. यातील ९० टक्के खाटा या भरलेल्या आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना एका रुग्णालयातून अन्य ठिकाणी हलविण्याची गरज निर्माण झाली आहे.