सिडकोची कारवाई, भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना मात्र दिलासा

अपुऱ्या पावसामुळे राज्यावरील पाणीसंकट दिवसेंदिवस गहिरे होत असताना सिडको प्रशासनानेही पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. प्रथम पिण्यासाठी पाणी यानुसार इतर कोणत्याही उपयोगासाठी पाणीवापरास र्निबध आणण्यासाठी सिडकोने कृती आराखडा आखला आहे. त्यानुसार इमारत बांधकामासाठी विकासकाकडून तात्पुरत्या स्वरूपात घेतल्या गेलेल्या नळजोडण्या तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कळंबोली नोडमधील ३५ इमारतींच्या बांधकामासाठीच्या तात्पुरत्या नळजोडण्या मंगळवारपासून तोडण्यास सुरुवात झाली. याच वेळी बांधकाम पूर्ण होऊन रहिवासी राहत असलेल्या रोडपाली येथील इमारतींकडे भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांचाही पाणीपुरवठा बंद करण्यात आला; परंतु ही कारवाई नंतर मागे घेण्यात आली. इमारतीत राहत असलेल्या रहिवाशांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाणी देण्यात यावे, असे सिडकोने धोरण जाहीर केल्याचे अधिकाऱ्यांच्या उशिराने लक्षात आल्याने ही कारवाई मागे घेण्यात आली.

सिडको वसाहतींत इमारतींचे बांधकाम मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून तात्पुरती नळजोडणी घेऊन विकासक दोन ते तीन वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करतात; मात्र यंदा पावसाने दगा दिल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागत आहे.

कळंबोली, कामोठे आणि खारघर या तीन वसाहतींमध्ये १५० इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामांचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सिडकोने सुरू केली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी या बांधकाम करणाऱ्या विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या उपाययोजनेत पाणीपुरवठा विभागाने रहिवासी राहत असलेल्या कळंबोली येथील इमारतींचे पाणी जोडणी बंद करण्याचे काम सुरू केले.

काही इमारतींचे विकासक पळून गेले आहेत. तर काही इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या इमारतींना बांधकामासाठी तात्पुरती नळजोडणी असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांवर ‘निर्जला एकादशी’ ओढवली.

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर १७ येथील सौभाग्य हाइट या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना याचा अनुभव मंगळवारी आला. सेक्टर १७ येथील रस्त्यावर बुधवार व गुरुवार हे दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचा सिडकोचा भोंगा फिरत असताना थेट सिडकोने पाणीजोडणी बंद करण्यासाठी मजूर पाठविले. त्यानंतर या रहिवाशांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे धाव घेतली.

ज्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे अशा ठिकाणचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. तेथील मजूर मोठय़ा प्रमाणात पाणी वापरतात. मात्र ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नाही, पण तेथे रहिवासी राहत असल्यास त्या इमारतींच्या नळजोडणी तोडू नका असेही पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना कळविले आहे. मानवतेच्या आधारावर हा निर्णय घेतला आहे. सिडको वसाहतींमधील रहिवाशांना किमान समान पाणीपुरवठा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

– दिलीप बोकाडे, कार्यकारी अभियंता, सिडको पाणीपुरवठा विभाग