नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये साडेतीन हजार करोना रुग्ण; कोपरखरणेत आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात करोनाचा सर्वदूर प्रादुर्भाव झाला असल्याचे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मंगळवापर्यंत तीन हजार चारशेपर्यंत करोना असून यापैकी दोन हजार ५८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात अतिसंक्रमित भाग कोपरखरणे पोलीस ठाणे परिसर असून आतापर्यंत पंधरा रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सर्वात कमी फक्त तीन रुग्ण हे मोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकूण २० पोलीस ठाणे येतात. यात परिमंडळ एकमध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्र तर परिमंडळ दोनमध्ये पनवेल आणि उरणचा काही भागाचा समावेश होता. हा सर्व परिसर महामुंबई म्हणून ओळखला जात असून या क्षेत्रातील सर्व पालीस स्टेशनअंतर्गत कमी जास्त प्रमाणात करोनाचे रुग्ण सापडले आहेत.

नवी मुंबईत पहिला करोना रुग्ण १३ मार्च रोजी वाशी येथे सापडला. तर कोपरखैरणेत १८ मार्च रोजी सेक्टर १९ सी येथे पहिला रुग्ण आढळून आला. तोपर्यंत शहरात करोनाचा प्रादुर्भाव मर्यादित होता. मात्र एपीएमसी बाजार आवारात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि शहरातील करोना रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढत गेली. एपीएमसीतील संपर्कामुळे कोपरखरणे नंतर अतिसंक्रमित परिसर झाला. मंगळवापर्यंत पोलीस आयुक्तालय क्षेत्रात साडेतीन हजार करोना रुग्ण सापडले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे कौपरखरणे पोलीस ठाणेअंतर्गत असून ही संख्या ४८२ पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे कोपरखैरणेत भीतीचे वातावरण आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वात कमी रुग्णसंख्या ही सीबीडी पोलीस ठाणे अंतर्गत असून ३० करोना रुग्ण सापडले आहेत. सुदैवाने अद्याप एकही मृत्यू झाला नाही तसेच परिमंडळ दोनमध्ये सर्वाधिक रुग्ण कामोठे येथे २०७ आहेत. तर सर्वात कमी तीन रुग्ण मोरा पोलीस ठाणे अंतर्गत आहेत.

कोपरखैरणेत करोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. मात्र हा आकडा सर्वाधिक तपासणी केल्याने समोर आला आहे. या ठिकाणी अण्णासाहेब पाटील बहुउद्देशीय रुग्णालयात ७० पेक्षा अधिक खाटांचे करोना रुग्णालयाचे नियोजन, थेट जनतेच्या संपर्कात जात तपासणी तसेच जनजागृती केली जात आहे.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त