कामोठे येथील महात्मा गांधी मिशन (एमजीएम) वैद्यकीय महाविद्यालयामध्ये परिचारिकेचे शिक्षण घेणाऱ्या ४० विद्यार्थीनीनी रविवारी रात्री जेवणातून विषबाधा झाली. सोमवारी सकाळी व रात्रीपर्यंत या मुलींना सतत उलटय़ा होऊ लागल्याने त्यांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. सूमारे १५ मुलींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर मंगळवारी दुपापर्यंत २६ मुलीवर रूग्णालयात उपचार सूरू होते. यामधील ६ मुलींवर अती दक्षता विभागात उपचार सूरू आहेत. हे प्रकरण पोलीसांपर्यंत पोहचू नये म्हणून एमजीएम व्यवस्थापनाने जिकरीचे प्रयत्न केले. मात्र मंगळवारी हे प्रकरण या विद्यार्थीनीच्या पालकांनी प्रसारमाध्यमांमधून पोलिसांपर्यंत पोहचवले.
कामोठे येथील एमजीएम महाविद्यालयामध्ये १०० विद्यार्थीनी परिचारीकेचे शिक्षण घेतात. त्यांच्या वसतीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅण्टीनची सोय एमजीएम व्यवस्थापनाने केली आहे. रविवारी रात्री परिचारीकेचे शिक्षण घेणाऱ्या सूमारे ५० विद्यार्थीनी याच कॅण्टीनमध्ये जेवल्या. या जेवणात डाळ भात व जिलेबी असे पदार्थ होते. सोमवारी सकाळपासून या विद्यार्थीना उलटय़ा होऊ लागल्या. सूरूवातीला अनेक विद्यार्थीनीनी उलटय़ांचा प्रकार कोणाला सांगीतला नाही, मात्र त्यानंतर सर्वच विद्यार्थीनीना उलटय़ा होतात ही बातमी समजताच विद्यार्थीनीनी वसतीगृहाच्या अधीक्षकांना हा प्रकार कळवला. एमजीएम रूग्णालयात या विद्यार्थीनींवर उपचार सूरू झाल्यानंतर जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या घटनेला २४ तास उलटून गेलेतरीही याबाबत कामोठे पोलीस ठाण्याला कळविण्यात आले नाही.
यापूर्वी एमजीएम वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डोक्यात पंखे पडले म्हणून, शिकवायला शिक्षक नाहीत म्हणून आणि प्रात्यक्षिकासाठी यंत्र नसल्याने आंदोलन पूकारले होते.

एमजीएममध्ये पोलीस चौकी असूनही घटनेवर पडदा
विशेष म्हणजे कामोठे एमजीएम रूग्णालयामध्ये अपघात होऊन आलेल्या रूग्णांची नोंद घेण्यासाठी येथे २४ तास पोलीस तैनात असतात. अकस्मात किंवा अपघाती घटनेतील व्यक्तींना विना पोलीस चौकशीचे या रूग्णालयात उपचार होत नाहीत. मात्र एमजीएम महाविद्यालयातील विषबाधेवर पडदा घालण्यात आला. एमजीएम रूग्णालयामध्ये पोलीसांची बसण्याची सोय आहे. तेथे तैनात असलेल्या पोलीसांपासून विषबाधेचा हा सर्व प्रकार दाबून ठेवण्यात आल्याने कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूझा यांनी आश्चर्य व्यक्त केले. डिसूझा यांना या घटनेची बाहेरून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विद्यार्थीनीचे जबाब नोंदवले. त्यानंतर अन्न औषधे प्रशासनाला या घटनेची माहिती दिली असून या विभागातील अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर याप्रकरणी कायदेशीर कारवाई डिसूझा करणार आहेत. या घटनेमध्ये कॅण्टीन व्यवस्थापनाची चूक आहे की कॅण्टीनचालकावर नियंत्रण ठेवणाऱ्या एमजीएम व्यवस्थापनाची याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या संपुर्ण घटनेबाबत एमजीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. एस. सलगोत्रा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.