नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ३६० नवे करोनाबधित आढळले आहेत. करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही दररोज वाढतच आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १४,९८७ झाली आहे. शहरात आज ४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ४११ झाली आहे.

शहरात आतापर्यत तब्बल १०,११६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ४,४६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत १३,९९१ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तात्काळ करोना चाचणी अहवाल प्राप्त होत असून शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

पालिकेने ‘मिशन ब्रेक दि चेन’ मोहिम सुरू केली आहे. शहरात करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला २,००० चाचण्या होत आहे. तर महापालिकेची करोना चाचणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा लवकरच नेरुळ येथे सुरू करण्यात येत आहे.