नवी मुंबई : अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटांचा तुटवडा असल्याने नवी मुंबईतील अत्यवस्थ रुग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त दिल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने ३७० खाटांची वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शहरात पालिका व खासगी रुग्णालयात अत्यवस्थ करोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या फक्त ४७० खाटाच उपलब्ध आहेत. त्यामुळे या रुग्णांची गैरसोय सुरूच आहे.

पालिका प्रशासनाने यासाठी नियोजन केले असून पुढील पंधरा दिवसात वाशी सिडको प्रदर्शनी केंद्रात ७५ अतिदक्षता व ३० कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा व पालिकेने करार केलेल्या डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयात १०० अतिदक्षता व ४० कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय ३० ऑक्टोबपर्यंत वाशी येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात १२५ अतिदक्षता खाटांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.

नवी मुंबई शहरात प्राणवायू खाटांची संख्या पुरेशी आहे. अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा कमी असली तरी पुढील पंधरा दिवसात यात मोठी वाढ होईल, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.