प्रभागनिहाय प्रारूप आराखडा जाहीर; ७८ पैकी ३९ जागा महिलांसाठी

पनवेल महानगरपालिकेचा प्रभागनिहाय प्रारूप आराखडा जाहीर झाला असून महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्यामुळे २० प्रभागांमध्ये असणाऱ्या ७८ जागांपैकी सर्वाधिक ३९ जागा महिलांना मिळाल्या आहेत त्यापैकी २४ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आणि १० जागा ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत.  पनवेल परिसरातून प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात महिला निवडून येणार असल्यामुळे महिलांच्या विकासाचा मार्ग खुला होण्यीच चिन्हे आहेत. वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात मंगळवारी ही सोडत काढण्यात आली.

महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून तीन महिन्यांत प्रभागनिहाय प्रारूप आराखडा मांडण्यात आला. प्रत्येक प्रभागामध्ये एका जागेवर सर्वसाधारण वर्गातील उमेदवाराला निवडणूक लढविता येणार आहे, असेही नियोजन जाहीर करण्यात आले. पनवेल महापालिका झाल्यानंतर पहिल्या सभागृहात सदस्यपदाचा मान मिळविण्यासाठी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीकडे सर्व राजकीय नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. कोणतीही प्रसिद्धी न करता कार्यकर्त्यांनी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रभागनिहाय रचना समजून घेण्यासाठी हाती कागद व पेन घेऊन फडके नाटय़गृहात गर्दी केली होती.

पनवेल महापालिका प्रशासनाने पनवेलमधील ग्रामीण जनतेला शहरी जनतेशी जोडण्याचा प्रयत्न या प्रभागरचनेत केल्याचे दिसते तर काही ठिकाणी दोन वसाहतींना एकत्र आणण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने केला आहे. प्रभाग ९ मध्ये आसूडगाव व कळंबोली हा परिसर एकाच प्रभागामध्ये आणताना कळंबोली सेक्टर २ व ३ चा परिसर जोडल्याने गावांमधील उमेदवारांना वसाहतींपर्यंत पोहचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. पालिका प्रशासनाने बनविलेल्या आराखडय़ावर १३ जानेवारीपर्यंत नागरिक तक्रारी व सूचना नोंदवू शकतील, अशी घोषणा आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केली. २० प्रभागांमध्ये दोन प्रभाग तीन वॉर्डचे आहेत, तर १८ प्रभाग चार वॉर्डचे आहेत.

सर्वाचे लक्ष प्रभाग क्रमांक १९ कडे

प्रभाग क्रमांक  १९ मध्ये ओबीसी व सर्वसाधारण महिलांसाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे. तसेच दोन जागा सर्वसाधारण वर्गातील व्यक्तींसाठी राखीव आहेत. याच प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रामशेठ ठाकूर त्यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर राहतात. तसेच पनवेल नगर परिषदेच्या काळात याच परिसरातून शेतकरी कामगार पक्षाचे जे. एम. म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे हे येथून नगर परिषदेत निवडून गेले होते. ठाकूर व म्हात्रे या दोन घरांतून पनवेलचे राजकारण चालवले जाते. प्रभागात जास्त लोकसंख्या असल्याने ठाकूर व म्हात्रे ही दोन्ही घराणी प्रतिस्पर्धेत लढणार की समन्वयाच्या राजकारणाची खेळी खेळण्यासाठी एक जण प्रभागाच्या बाहेर जाऊन लढणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सोडत काढणाऱ्याची ‘लॉटरी’ मंगळवारची फडके नाटय़गृहामधील सोडत ११ वाजता सुरू झाली. तक्का परिसरातील ओबीसी महिला आरक्षणाच्या सोडतीची चिठ्ठी शाळकरी मुलाने काढली आणि हा मुलगा नाटय़गृहाच्या खुर्चीवर बसण्यासाठी जात असताना त्या मुलाला एका व्यक्तीने कोणाला काही समजण्याच्या आत दोन हजार रुपयांची नोट दिली. ही नोट तक्का परिसरातून महिलेला मिळालेल्या संधीसाठी होती. पत्नीला संधी मिळावी ही इच्छा पूर्ण झाल्याने त्या व्यक्तीने ही नोट दिली होती.