आठवडय़ात चार घटना उघडकीस; चार जणांना अटक

नवी मुंबई : नवी मुंबईत रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. यात एक डॉक्टर आणि एका प्रयोगशाळा चालकाचाही समावेश आहे. शुक्रवारी रात्रीही एकाला अटक करण्यात आली असून तो २४ हजारांना एक इंजेक्शन विकत होता.

गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार खांदा कॉलनी येथील खानदेश हॉटलसमोर एक इसम रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन येणार असल्याचे समजले. त्या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलीस हवालदार अनिल पाटील, साळुखे, रूपेश पाटील, सचिन पवार, सुनील कुदळे, सूर्यवंशी, सचिन म्हात्रे यांनी सापळा लावत राहुल देवराव कानडे याला अटक केली. आरोपी कानडे याने ३५ हजार रुपयांना हे इंजेक्शन देण्याचे मान्य केले होते. विशेष म्हणजे आरोपी हा प्रयोगशाळातंत्रज्ञ आहे. त्याच्याकडील इंजेक्शन जप्त करण्यात आले असून आणखी काहींना अटक होण्याची शक्यता असल्याचे गोरे यांनी सांगितले.

शुक्रवारी रात्री मनसेचे जयदीप ढमाले, प्रवीण हिंगे, शुभम इग्वाले आणि नटेश नलावडे यांना कोपरखैरणे येथील सेक्टर १५ च्या नाक्यावर रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन एक जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी संबंधित व्यक्तीला गाठले असता त्याच्याकडे ग्राहक म्हणून चौकशी केल्यावर त्याने २४ हजार रुपये किंमत सांगितली. त्यामुळे सदर व्यक्तीकडे तीन रेमडेसिविर इंजेक्शन असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी त्याला कोपरखैरणे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने खात्री केल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती कोपरखैरणे पोलिसांनी दिली.

काही दिवसांपूर्वी खारघर येथे गुन्हे शाखेने हरपिंदर सिंग आणि त्याला साहाय्य करणारा डॉ. कमलाकांत सिंग याला अटक केली होती. यातील डॉ. कमलाकांत हा कोविड रुग्णालयात काम करीत होता. तो ज्याला गरज नाही अशा रुग्णाच्या नावे रेमडेसिविर इंजेक्शन मागवत होता व ज्यांना गरज आहे त्यांना हरपिंदर सिंगच्या मध्यस्थीने रुग्णाच्या ऐपतीनुसार विकत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली. तसेच एपीएमसी पोलीस ठाणेअंतर्गत जस्मिन डिसुजा या महिलेसही पोलिसांनी अटक केली होती.