26 September 2020

News Flash

४ अपहृत, ७ बेवारस मुले कुटुंबाच्या स्वाधीन!

बेलापूर गावातून ३० नोव्हेंबरला एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत पोलिसांची कारवाई

नवी मुंबई : ‘ऑपरेशन मुस्कान’ या मोहिमेंतर्गत ४ अपहृत अल्पवयीन आणि ७ बेवारस अल्पवयीन मुलांचा शोध घेत त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे.

यामध्ये बेलापूर गावातून ३० नोव्हेंबरला एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. हा मुलगा रत्नागिरी येथे असल्याची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग दोन दिवस रत्नागिरी परिसरात त्याला १३ डिसेंबरला शोधून काढले. त्याचप्रमाणे उलवे येथील १ डिसेंबर रोजी १७ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तिचा शोध घेत असताना ही युवती पनवेल येथे एका इसमाबरोबर असल्याची माहिती मिळताच तिला शोधून काढले. तिला ज्या व्यक्तीने पळवून नेले होते त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना १४ डिसेंबर रोजी घडली. तिसऱ्या घटनेत नेरुळ येथून १६ वर्षीय मुलीच्या अपहरण गुन्ह्य़ाचा तपास करीत असता ही मुलगी नेरुळ रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती मिळताच तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिला पळवून आणणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. ही घटना १४ डिसेंबर रोजी घडली. चौथ्या घटनेत करावे येथून १० ऑक्टोबर रोजी एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याच्या प्रकरणाचा तपास करीत असताना तिला पळवून उत्तर प्रदेश येथे नेले असल्याची माहिती मिळाली. मात्र माहीतगाराकडून ही जोडी पुन्हा खारघर येथे परतत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी स्टेशनवरच सापळा लावून मुलीची सुटका केली. ही घटना १५ डिसेंबर रोजी घडली.

याचबरोबर गुन्हा नोंद नसलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेत त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याचे प्रयत्न सुरु असतात. या अनुषंगाने सात मुलांना त्यांच्या पालकाकडे सोपवण्यात यश आले आहे. यामध्ये ६ डिसेंबर रोजी तीन मुले (वय ११, ११ व १२) बेलापूर रेल्वे स्टेशनमध्ये फिरत असताना आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी करता घरी न सांगता फिरायला गेले, पण पुन्हा घरी कसे जायचे हे कळत नसल्याची माहिती या मुलांनी दिली. पोलिसांनी मुलांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पालकांचा शोध घेत त्यांच्या ताब्यात मुलांना देण्यात आले. तसेच ११ डिसेंबर रोजी जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरात ९ व १० वर्षांची मुले फिरताना आढळून आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते रस्ता चुकले असून सानपाडा उड्डाणपुलाखाली राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या पालकांचा शोध घेत या मुलांना त्यांच्या ताब्यात दिले. मानखुर्द येथे राहणारे चार-सहा वर्षांची मुले जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते मानखुर्द येथे राहात असून जुईनगर येथे त्यांचे वडील हार विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडेच मुले आली, मात्र रस्ता चुकले होते.

लहान मुलांचे अपहरणाचे प्रमाण गंभीर झाल्याने केंद्र सरकार ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत डिसेंबर महिन्यात विशेष मोहीम राबवली जाते. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, माहोला पोलीस उपनिरीक्षक ज्योती सूर्यवंशी, पोलीस हवालदार शितोळे, महिला पोलीस नाईक अर्चना गोसावी, पोलीस नाईक कोकरे आणि पवार यांनी विशेष मेहनत घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 2:59 am

Web Title: 4 kidnapped 7 destitute children rescued under operation muskan in navi mumbai
Next Stories
1 शिल्लक घरांची नववर्षांत सोडत
2 ना विस्तार, ना फेऱ्यांत वाढ!
3 अतिज्वलनशील पदार्थाची साठवणूक धोकादायक
Just Now!
X