सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव; शहरात ४३९ कॅमेरे बसविणार; गुन्हेगारीचे प्रमाण कमी होणार

नवी मुंबई : गेली सहा महिने रखडलेला नवी मुंबई पालिका प्रशासनाचा प्रस्ताव येत्या बुधवारी सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येणार आहे. या सभेत नगरसेवकांनी या सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता न दिल्यास प्रशासन त्याची ९० दिवसांनंतर अंमलबजावणी करणार आहे. या प्रस्तावात शहरातील जुने २८२ सीसी टीव्ही कॅमेरे अद्ययावत करून नवीन सुमारे एक हजार ४३९ सीसी टीव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. त्यामुळे राज्यात नवी मुंबई हे एकमेव असे शहर आहे जे संपूर्ण सीसी टीव्ही कॅमेराच्या देखरेखेखाली येणार आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सीसी टीव्ही कॅमेरांची गरज व्यक्त केली. नवी मुंबई पालिकेने त्यानंतर दोन वर्षांनी २०१२ मध्ये शहराच्या मोक्याच्या ठिकाणी २८२ सीसी टीव्ही कॅमेरे लावून हे शहर काही अंशी सीसी टीव्हीच्या देखरेखेखाली आणले होते, पण ते कॅमेरेदेखील आता जुने झाले असल्याने त्यांचे ‘हार्डवेअर बायबेक’ देऊन ते अद्ययावत केले जाणार आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात सीसी टीव्ही कॅमेरे लावणार होते. त्यासाठी राज्याच्या गृहविभागाकडे गेली पाच वर्षे हा प्रस्ताव धूळ खात पडल्याने शहरातील नागरिकांच्या सुरक्षितेची जबाबदारी स्वीकारून पालिकेने आपल्या क्षेत्रात हे सीसी टीव्ही कॅमेराचे जाळे विणण्याची तयारी दर्शवली आहे. नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने या सीसी टीव्ही कॅमेरांच्या जागा निश्चित केलेल्या आहेत. या सीसी टीव्ही कॅमेराद्वारे शहरात येणाऱ्या सहा प्रवेशद्वारमधून ये-जा करणाऱ्या वाहनांची माहिती ठेवली जाणार आहे. यात ऐरोली मुंलुंड खाडीपूल, ठाणे दिघा प्रवेशद्वार, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका, किल्ले गावठाण आणि बेलपाडा अशी सहा ठिकाणे आहेत. सीसी टीव्ही कॅमेराबरोबरच स्वयंचलित क्रमांक प्लेट ओळख (एएनपीआर) ५४ कॅमेरे यात आहेत. ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स बसविले जाणार आहेत. जेणेकरून नागरिकांना आपत्कालीन स्थितीत हा अलार्म वाजविता येणार असून कॉल बॉक्सवरून नियंत्रण कक्षाला कळविता येणार आहे. यासाठी पालिका आठ ठिकाणी छोटे नियंत्रण कक्ष उभारणार  असून मुख्य नियंत्रण कक्ष मुख्यालयात सुरू केला जाणार आहे.

याची एक जोडणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षाला दिली जाणार आहे. नवी मुंबई पालिकेने लावलेल्या २८२ सीसी टीव्ही कॅमेरामुळे पोलिसांना अनेक गुन्ह्य़ाची उकल करताना मदत झाली आहे.

शहरात दीड हजारापर्यंत सीसी टीव्ही कॅमेरांचे जाळे लागल्यानंतर गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रवेशद्वारावर ‘एचडी कॅमेरे’

*  नवी मुंबईत प्रवेश केल्या जाणाऱ्या सहा प्रवेशद्वारावर हाय डेफिनेशन फिक्स व हाय स्पीड कॅमेरे लावले जाणार आहेत.

* नवी मुंबईत ये-जा करणाऱ्या सर्व वाहनांची इत्थंभूत माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित क्रमांक प्लेट ओळख दाखविणारे ५४ एएनपीआर कॅमेरे

* शहरातील २७ प्रमुख चौकात १०८ हाय डेफिनेशन व हाय स्पीड कॅमेरे

* शहरातील सर्व रेल्वे स्थानके, बस डेपो, मार्केट, वर्दळीची सर्व ठिकाणे, उद्याने मैदाने, पालिका कार्यालये, चौक, जंक्शन आणि धार्मिक स्थळे ठिकाणी ३९६ पीटीझेड कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

* पामबीच, शीव पनवेल महामार्ग, ठाणे बेलापूर मार्ग आणि मुख्य चौकात ८० हाय स्पीड कॅमेरे

* ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स

* खाडी व समुद्रकिनाऱ्यांवर ९ थर्मल कॅमेरे