अर्थसंकल्पात ४९९.४१ कोटींची तरतूद; गतवर्षीपेक्षा १८० कोटींची वाढ

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : करोनातंर पालिकेची आरोग्यसेवा तोकडी पडल्याने पालिका प्रशासनाने आरोग्यसेवा सक्षम करण्यावर भर दिला आहे. पालिकेच्या नेरुळ व ऐरोली रुग्णालयात सामान्य रुग्णालयाच्या सेवा सुरू करण्यात आल्या असून अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ४९९.४१ कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यात १८० कोटींची वाढ करण्यात आली असून ऐरोली, नेरूळ व बेलापूर ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे ठरविले आहे.

त्यामुळे पुढील काळात वाशी रुग्णालयाप्रमाणेच नेरुळ व ऐरोली रुग्णालयातही प्रत्येकी ३०० खाटांची सेवा नवी मुंबईकरांना मिळणार आहे.  त्यामुळे शहरात एकूण पालिकेच्या ९०० खाटांची सेवा सुरू होणार आहे.

करोनापूर्वी नवी मुंबई वाशी येथील सामान्य रुग्णालयाबरोबर ऐरोली, नेरुळ व बेलापूर या माताबाल रुग्णालयांसह आरोग्य केंद्रामार्फत् आरोग्य सेवा दिली जात होती. मात्र या रुग्णालयात फक्त बा रुग्णसेवा मिळत असल्याने वाशी रुग्णालयावर प्रचंड ताण पडत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. त्यात करोनानंतर ही आरोग्यसेवा तोकडी पडल्याने पालिका प्रशासनाला करोनाकाळात आरोग्यसेवा उभारण्यावर भर द्यावा लागला होता. त्यामुळे पालिका आयुक्तांनी शहराच्या आरोग्यसेवा बळकट करण्यावर भर दिला आहे. १ जानेवारीपासून ऐरोली व नेरुळ रुग्णालयांतील सेवा वाढविण्यात आली आहे.  या ठिकाणी अतिदक्षता व औषध विभाग प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला असून पुढील काळात या दोन्ही रुग्णालयांत ३०० खाटांची सेवा देण्यात येणार आहे. आवश्यक उपकरणे व साहित्य उपलब्धता, औषधे उपलब्धता, आरोग्यविषयक मनुष्यबळाची पूर्तता करण्यावर भर दिला जाणार आहे. पुढील टप्प्यात शस्त्रक्रियाही या ठिकाणी होतील अशी तयारी ठेवली आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्याालय

अर्थसंकल्पात सार्वजनिक रुग्णालयांमार्फत उच्च दर्जाची व अद्ययावत वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी व प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्यासाठी शहरात वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालय सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन असून यासाठी अर्थसंकल्पात दोन कोटीची तरतूदही करण्यात आली आहे. यातून काळात प्रयोगशाळा, वैद्यकीय ग्रंथालय, वर्गखोल्या अशा विविध सुविधा करण्यात येणार आहेत.