नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एक क्षेत्रातून गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव दरम्यान ५० जणांना २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यात गणेश उत्सव काळात २९ तर नवरात्र उत्सव दरम्यान २१ जणांचा समावेश असून तुर्भे एमआयडीसी क्षेत्रातून सर्वाधिक हद्दपारी कारवाई करण्यात आली आहे.

शहरांतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विविध उपाययोजना करीत असतात. याच योजनाचा एक भाग म्हणजे तडीपारी. रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच शिक्षा भोगून आलेले मात्र पुन्हा गुन्हेगारी क्षेत्रातच कार्यरत असलेल्या गुन्हेगारांना राहत असलेल्या व आसपासच्या जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात येते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातही तडीपारीची मोठी कारवाई करण्यात आली यात गणेश उत्सव व नवरात्र या सार्वजनिक आणि मोठय़ा प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या उत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ  नये म्हणून खबरदारीचा उपाय करीत असताना विविध गुन्ह्य़ांतील आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. त्यामुळे या ५० गुन्हेगारांना नवी मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ात वास्तव्य करता येणार नाही. नव्याने नवरात्र उत्सव दरम्यान २१ जणांना तडीपार करण्यात आले त्यात रबाळे पोलीस ठाणेअंतर्गत साई प्रसाद राऊत, सुनील कांबळे, तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत- जय भीम मनगुळे, भास्कर पुजारी, बाबासाहेब म्हस्के, कलीम कुरेशी, आकाश ऊर्फ काळू चव्हाण, नूर शेख, आकाश जाधव, बबलू खान, रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणेअंतर्गत – सुभाष यादव रामशंकर यादव, तानाजी नवसरे, राजेश सोनार, संदीप ऊर्फ समाधान रावडे, आशीष ऊर्फ सोनू पांडे, नेरूळ पोलीस ठाणे अंतर्गत- नितेश ठाकूर, नुरीन भोईर, सीबीडी पोलीस ठाणे अंतर्गत – वशिष्ठ यादव, एपीएमसी पोलीस ठाणे अंतर्गत- गुड्डू खान, गोरख म्हात्रे यांचा समावेश आहे.

या सर्वावर विनयभंग, घरफोडी, मारामारी, साखळी चोरी, जुगार, वाहन चोरी अशा विविध गुन्ह्य़ांची नोंद आहे.

शहरात शांतता व सुरक्षितता राहावी यासाठी वारंवार गुन्हेगारी मार्गाचा अवलंब करणाऱ्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली. शहरात शांतता राहावी याचबरोबर नवीन जागेत राहून सामान्य जीवन जगून गुन्हेगारीपासून दूर राहावे ही गुन्हेगारांना संधी देण्याचा उद्देश असतो.

– डॉ. सुधाकर पठारे, उपायुक्त परिमंडळ एक