रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा; अतिदक्षता, जीवरक्षक प्रणालींचा तुटवडा

नवी मुंबई</strong> : दैनंदिन करोना रुग्णसंख्या एक हजारपेक्षा अधिक, त्यात करोनामुक्त रुग्णांची संख्या घटल्याने पंधरा दिवसांपूर्वी शहरात सर्वच प्रकारच्या खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यात अतिदक्षता व जीवरक्षक प्रणालीच्या खाटा वेळीच उपलब्ध होत नसल्याने गरज असलेल्या रुग्णांना प्रतीक्षेत थांबावे लागत होते. शहरातील ही गंभीर परिस्थिती आता बदलली आहे. दैनंदिन रुग्ण तीनशेच्या घरात आले असून पोलिकेच्या डॅशबोर्डवर शहरातील रुग्णालयांमध्ये ५० टक्के खाटा रिक्त असल्याचे चित्र आहे. मात्र अतिदक्षता, जीवरक्षक प्रणालींचा काही प्रमाणात तुटवडा कायम आहे.

जानेवारी, फेब्रुवारीमध्ये शहरात करोनाची परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आली होती. मात्र मार्चपासून करोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि दैनंदिन करोना रुग्णांत वाढ सुरू झाली. एप्रिलमध्ये तर शहरात झपाटय़ाने रुग्णवाढ होत दैनंदिन करोना रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली. १४४१ दैनंदिन सर्वोच्च रुग्ण नोंदवली गेली. त्यामुळे उपलब्ध खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. अत्यवस्थ रुग्णांची संख्या ही ५५० पर्यंत पोहोचल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना खाटा मिळवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. पंधरा दिवसांपूर्वी तर शहरात एकही खाट शिल्लक नसल्याचे चित्र होते. त्यामुळे रुग्णवाढ कायम राहिल्यास शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र राज्य शासनाने कडक संचारबंदी लागू केल्यानंतर शहरातील हे चित्र बदलत गेले. दैनंदिन करोना रुग्णसंख्या कमी होत गेली व प्रशासनाने कामोठे एमजीएम, सिडको प्रदर्शनी केंद्र डॉ.डी.वाय पाटील रुग्णालय व खासगी रुग्णालयातही अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यक खाटांची संख्या वाढवल्याने शहरात खाटांची उपलब्धता झाली. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या तीनशेच्या घरात आली असून करोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे शहरात ५० टक्के खाटा शिल्लक असल्याचे पालिकेच्या डॅशबोर्डवर दाखवले जात आहे. सर्व प्रकारच्या मिळून शहरात ६ हजार ७६५ खाटा असून ३ हजार ३९८ खाटा शिल्लक आहेत. त्यात साध्या खाटा २६४३ तर प्राणवायू असलेल्या ६८५ खाटा शिल्लक आहेत. सद्य:स्थितीत ५४ अतिदक्षता व १६ जीवरक्षक प्रणाली असलेल्या खाटा शिल्लक दाखवत असल्या तरी या खाटांसाठी रुग्णांची गैरसोय सुरू आहे. त्यात अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त असल्याने या खाटांचा तुटवडा आजही कायम आहे.

करोना रुग्ण कमी होत असून करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. अत्यवस्थ रुग्णांची संख्या पुढील दोन आठवडय़ात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अतिदक्षता खाटा उपलब्ध होत असून जीवरक्षक प्रणाली असलेल्या खाटांची मागणी आजही कायम आहे. अतिदक्षता खाटांची मागणी ४ टक्के तर जीवरक्षक खाटांची ४० टक्के मागणी होत आहे.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

शहरातील खाटांची स्थिती

खाटांचा प्रकार          एकूण खाटा     व्यापलेल्या खाटा      रिक्त खाटा

साध्या खाटा                ३८७४            १२३१                       २६४३

प्राणवायू खाटा             २००७            १३२२                       ६८५

अतिदक्षता खाटा           ६५३             ५९९                         ५४

जीवरक्षक प्रणाली          २३१             २१५                         १६

एकूण खाटा                  ६७६५         ३३६७                        ३३९८

रुग्णदुपटीचा कालावधी १९० दिवसांवर

नवी मुंबई : मार्चमध्ये करोनाचे दैनंदिन रुग्ण वाढल्याने शहरातील रुग्णदुपटीचा कालावधी घटला होता. १ एप्रिल रोजी ८० दिवसांवर आलेला कालावधी १५ एप्रिलनंतर सातत्याने रुग्णांची संख्या कमी होत गेल्याने १९० दिवसांवर गेला आहे. शहरातील रुग्णदुपटीचा कालावधी जानेवारीमध्ये ७३५ दिवसांवर गेला होता. परंतु आता १ फेब्रुवारीपासून पुन्हा सातत्याने रुग्णवाढ होऊ  लागल्याने रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत ५० दिवसांपर्यंत खाली गेला होता. रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी वाढून तो १९० दिवसांवर पोहोचला आहे. हा नवी मुंबईकरांसाठी दिलासा असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

रुग्णदुपटीचा कालावधी..

* १५ ऑगस्ट : ४५ दिवस

* १५ सप्टेंबर :  ६७ दिवस

* १५ ऑक्टोबर : १११ दिवस

* १५ नोव्हेंबर : ३५२ दिवस

* १५ डिसेंबर : ४५४ दिवस

* १५ जानेवारी : ६३४ दिवस

* २ फेब्रुवारी : ७३५ दिवस

* १६ फेब्रुवारी : ५८१ दिवस

* १ मार्च : ३७५ दिवस

* १ एप्रिल : ८० दिवस

* ५ मे : १९० दिवस