कुटुंबातील ४० टक्के तर मित्रमंडळींमध्ये १० टक्के नवे रुग्ण

नवी मुंबई : शहरात करोनाबधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. पहिल्या लाटेत कधीही दैनंदिन नव्या रुग्णात ५०० चा आकडा पार  केला नव्हता. मात्र दुसऱ्या लाटेत रुग्णांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे. नव्या करोना रुग्णांच्या बाधितांची साखळी तोडण्यासाठी त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेतला जातो. या व्यक्ती शोधामधून ५० टक्के नवे रुग्ण आढळत आहेत. यामध्ये कुटुंबातील व्यक्तीमध्ये अंदाजित ४० टक्के तर जवळच्या मित्रमंडळीमध्ये १० टक्के अशी नव्या बधितांची महिती समोर येत आहे.

नवी मुंबई शहरात करोनाने पुन्हा डोके वर काढले असून त्यामुळे प्रशासनही चक्रावून गेले आहे. नवी मुंबई महापालिका ही साखळी खंडित करण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आता महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रे आणि त्या ठिकाणची प्रभावी अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले आहे. आणखी नवे बाधित सापडू नयेत म्हणून करडी नजर ठेवून आहेत. तसेच रुग्णांच्या संपर्क व्यक्ती शोधावर भर देऊन कमीतकमी रुग्णांच्या संपर्कातील ३० व्यक्ती शोधल्या जात आहेत. यामध्ये साहजिकच कुटुंबातील आणि जवळचे निटकटवर्तीय हे नवे बाधित होत असल्याचे आढळत आहे.  शहरात आता दररोज हजार ते दीड असे रुग्ण आढळत आहेत. यामधील ५०% रुग्ण हे या रुग्णांच्या संपर्कातील नवे रुग्ण आहेत. करोना रुग्णांच्या संपर्कातील त्यांचे जास्त जोखमीचे कुटुंबीय हे बाधित होण्याचे अंदाजित प्रमाण ४० टक्के आहे तर जवळची मित्रमंडळी, इतर कमी जोखीम असलेले निटकटवर्तीय हे बाधित होण्याची शक्यता १० टक्के आहे.  या प्रेत्यक बधिताच्या मागे ३० व्यक्ती असे अनेक गुणाकार होऊन बाधित रुग्णांचा आकडा अधिक वाढत आहे. शहरात सध्या १० हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण ७४ हजार ७७७ करोनाबाधित रुग्ण झाले असून ३ लाख ०६ हजार ७७६ नागरिक गृहविलगीकरणात आहेत.

शहरातील करोना साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र आणि व्यक्ती शोध यावर अधिक भर दिला जात आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधामधून अंदाजे जास्त जोखमीचे कुटुंबीय ४० टक्के तर कमी जोखमीची जवळची मित्रमंडळी १० टक्के असे नवे बाधित सापडण्याचे प्रमाण आहे.

– अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका