नवी मुंबई महापालिकेची शासनाला हमी

नवी मुंबई  : दिवसाला २५ हजार लसमात्रा देण्याची तयारी असलेल्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मागणी तसा पुरवठा झाल्यास दिवसाला ५० हजार लसमात्रा देण्याची हमी शासनाला दिली आहे. याप्रमाणे लस पुरवठा झाल्यास नवी मुंबईकरांची लसप्रतीक्षा संपणार आहे.

लोकसंख्येनुसार राज्य शासनाला केंद्राकडून लस मिळत असल्याने सर्वच शहरांत सध्या लस तुटवडा भासत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता पाहत नागरिकांना लसकवच देण्यासाठी राज्यशासनाने मागणी तास पुरवठा करण्याची मागणी केंद्राकडे केली असून त्यांना एक कोटी लसमात्रा मिळणार आहेत. त्यानुसार प्रत्येक शहर व तालुक्यात स्थानिक प्रशासनाने लस नियोजन काय केले आहे याची माहिती राज्य शासन घेत आहे. यात नवी मुंबई महापालिकेने दिवसाला ५० हजार नागरिकांना लसमात्रा देण्याची आमची तयारी असल्याचे कळविले आहे.

सध्या शहरात ८५ लस केंद्रांची संख्या आहे. ती वाढवून शंभर करण्याचे पालिकेचे नियोजन असून वाशी विष्णुदास भावे येथील लसीकरण केंद्रावर जम्बो लसीकरण केंद्र करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आगामी काळात लसीकरणाला वेग येण्याची आशा निर्माण झाली आहे.

देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला, तर १ मे या महाराष्ट्र दिनापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. परंतु लस तुटवडय़ाअभावी शहरात मागील अनेक दिवसांपासून लसीकरण मोहीम सातत्याने विस्कळीत होत आहे. १८ ते ३० वयोगटातील तरुणाईला दोन महिने मोफत पहिल्या मात्रेची प्रतीक्षा करावी लागली आहे. दोन महिन्यानंतर कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाल्याने बुधवारी १७,५०० मात्रांच्या लसीकरणासाठी ८३ केंद्रांवर पालिकेने लसीकरण केले.

महापालिकेने सुरवातीपासूनच एका दिवसात जास्तीत जास्त लसमात्रा देण्याचे लक्ष्य ठेवत नियोजन केले होते. दिवसाला २५ हजार लसमात्रा देण्याची आमची तयारी आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात लस केंद्राचे नियोजन आहे. मात्र सुरुवातीला मागणीनुसार मिळणारी लसमात्रा नंतर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मिळू लागल्याने ही केंद्रे कधी सुरुवात तर कधी बंद ठेवावी लागत असल्याचे पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.

सध्या महापालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली येथील रुग्णालयाबरोबरच नागरी आरोग्य केंद्रे, शाळा या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. त्यात वाढ करुन जम्बो लसीकरण केंद्र वाढवून एका दिवसात ५० हजार दिली जाण्याचे पालिकेने तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात लस घेण्यासाठी पात्र असलेल्या जवळजवळ ११ लाख नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्य शासनाला १ कोटी लसमात्रा मिळणार असून मागणीनुसार लस मिळण्याची शक्यता आहे. याबाबत नवी मुंबई महापालिकेने एका दिवसात ५० हजार लसमात्रा देण्याची तयारी दाखवली आहे. त्यानुसार तयारी सुरू आहे. लसपुरवठा झाल्यास शहरातील पात्र सर्वच नागरिकांना लसकवच देण्यासाठी पालिका तयार आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

लसीकरण पात्र लोकसंख्या

६ लाख ३० हजार    १८ ते ४५ वयोगट

४ लाख ५० हजार    ४५ वर्षांवरील नागरिक

१० लाख ८० हजार    एकूण