पनवेल महापालिकेसाठी  सुमारे ५२ टक्के मतदान * सर्वाधिक ७८ टक्के मतदान प्रभाग क्रमांक १मध्ये * ४१८ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद * प्रभाग ५, ६ मध्ये यंत्र सील करताना गोंधळ

पनवेल महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारांना चिंता होती ती सुट्टीमुळे मतदानाचा टक्का घटण्याची. गावी गेलेले मतदार आणि सहनशक्तीचा अंत पाहणारे ऊन याचा विचार करता मतदानाची टक्केवारी ४० चा आकडा तरी पार करेल की नाही, अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती, पण बुधवारी मतदान केंद्रांवर लागलेल्या लांबलचक रांगा पाहता ही भीती फोल ठरल्याचे स्पष्ट झाले. सुमारे ५२ टक्के मतदारांनी टळटळीत उन्हातही घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला.

पनवेल पालिकेमध्ये ७८ जागांसाठी २० प्रभागांमध्ये ४ लाख २५ हजार ४५३ मतदार असून ४१८ उमेदवार आमनेसामने आहेत. बुधवारी ५७० मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ७८ टक्के मतदान प्रभाग १ मध्ये झाले, तर प्रभाग २ मध्ये ७६ टक्के मतदान झाल्याचे समजते. हे दोनही प्रभाग तळोजा परिसरात आहेत. निवडणूक आयोगाने रात्री उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध केली नाही. ३ हजार २०० कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी ही प्रक्रिया पार पाडली. कामोठे या परिसरात ५५ टक्के मतदान झाल्याचे       कळते. तळोजा व खारघर व्हॅलीशिल्प या परिसरातील प्रभाग ३ मध्ये ६२ टकके मतदान झाले. खारघर येथील प्रभाग ६ मध्ये ५० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

तर पनवेल शहरातील टिळकरोड या परिसरातील प्रभाग १८ मध्ये ६२.५५ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. कळंबोली व नवीन पनवेल या वसाहतींमध्ये किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी निवडणूक आयोगाने स्पष्ट केला नाही.

खारघर येथील प्रभाग ६ मध्ये मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान यंत्र सिल करताना उमेदवारांना प्रवेश न दिल्यामुळे गोंधळ झाला. अशीच परिस्थिती प्रभाग ५ मध्ये होती. रात्री आठ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने निवडणुकीविषयाची स्पष्ट आकडेवारी जाहीर केली नव्हती.

सेल्फी स्पर्धेत ३५५ जणांचा सहभाग

पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी आपला हक्क बजावावा म्हणून महापालिकेने आयोजित केलेल्या सेल्फी स्पर्धेला पनवेलवासीयांनी अल्प प्रतिसाद दिला. संध्याकाळी साडेसहापर्यंत अवघ्या ३५५ मतदारांनी आपले सेल्फी महापालिकेने दिलेल्या व्हॉट्अ‍ॅप क्रमांकावर पाठवले. त्यापैकी प्रत्येक प्रभागातील पाच मतदारांना मालमत्ता करात २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पालिकेच्या पथकाकडून सेल्फीची छाननी केली जाणार आहे. त्यातून प्रत्येक प्रभागातील पाच अशा एकूण २० प्रभागांतून १०० सेल्फीची निवड केली जाणार आहे. ही नावे ३० मे रोजी प्रसिद्ध केली जातील. या उपक्रमात सर्व वयोगटांतील मतदार सहभागी झाले. कौटुंबिक सेल्फीचे प्रमाणही मोठे आहे.

यापूर्वीच्या निवडणुकींचा इतिहास

२०१४ साली झालेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये २०१४ साली भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांना १,२५,१४२ मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना १,११,९२७ मते मिळाली होती. शिवसेनेचे वासुदेव घरत यांना १७,९५३ मते मिळाली होती. पनवेल पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढत आहे.

पॅनलमुळे आश्चर्यकारक निकालाची शक्यता

पॅनल पद्धतीत एकाच पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येतील, असे आडाखे बांधले जात आहेत, मात्र तसे न घडता चार जागा वेगवेगळ्या पक्षाच्या पारडय़ात पडण्याचीही शक्यता आहे. पॅनल पद्धतीतील मतदानाविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा काही मते एका पक्षाच्या उमेदवाराला आणि उर्वरित मते दुसऱ्याच पक्षाला दिली गेल्यास एका प्रभागातील जागा विभागल्या जाण्याची शक्यता आहे. ज्यांनी मतदारांना लक्ष्मीदर्शन घडवले नाही, त्यांना मत न दिले जाण्याची भीती आहे. त्यामुळे मतदान प्रक्रीयेत आश्चर्यकारक निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

मतदारांसाठी खास वाहने

मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी उमेदवार, त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना अगदी अखेरच्या दिवसापर्यंत झगडावे लागले. मतदारांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी बुधवारी शक्य ती सर्व वाहने प्रत्येक उमेदवाराने दिमतीला ठेवली होती. या निवडणुकीत नोकरदार अपक्ष, भाडय़ाच्या घरात राहणारे आणि दुचाकीवर फिरणाऱ्या उमेदवारांपासून बंगल्यात राहणारे आणि कोटय़वधीच्या आलिशान गाडय़ांतून फिरणारे उच्चभ्रू उमेदवारही रिंगणात आहेत. उमेदवाराने आपल्यालाच मतदान करावे यासाठी गेला महिनाभर सर्वच उमेदवारांनी आपली क्षमता पणाला लावली. बुधवारी आव्हान होते ते त्यांना मतदान केंद्रावर हजर करण्याचे. तळपत्या सूर्याने हे आव्हान अधिकच बिकट केले.