निर्यात भवन महिलांसाठी राखीव, आणखी १३०० खाटांचे नियोजन

नवी मुंबई</strong> : शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने पालिका प्रशासनाने रुग्णांसाठी आवश्यक खाटांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. ४ हजार ३५८ खाटांची संख्या आता ५ हजार ३५८ वर पोहोचली आहे. वाशी येथील निर्यात भवन महिला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथेही १ हजार प्राणवायूयुक्त खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर आणखी तेराशे खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील करोनाबाधितांची संख्या २६ हजारांच्या पुढे गेली असून  ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार ५०० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे विविध सुविधांयुक्त खाटा पुरविण्यावर पालिकेने भर दिला आहे. निर्यात भवन येथील केंद्र  सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे केंद्र प्राणवायूयुक्त खाटांची सुविधा असलेले असून ते फक्त महिला करोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात ४ हजार ३५८ खाटांची सुविधा आता ५ हजार ३५८ वर पोहोचली आहे. वाशी येथील निर्यात भवन तसेच  तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथे फक्त १ हजार प्राणवायूयुक्त खाटांची सोय करण्यात आली आहे.

दुसरीकडे प्रतिजन चाचण्यांची संख्याही वाढली आहे. नवी मुंबई शहरात राजकीय व सामान्य नागरिकांकडूनही खाटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत होत्या. तर दुसरीकडे अवाजवी देयके खासगी रुग्णालायातून उकळण्यात येत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. शहरातील १० रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे पालिकेने व्यवस्था वाढविण्याचे ठरविले आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील निर्यात भवन व तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथे १००० प्राणवायूयुक्त खाटांची निर्मिती करण्यात आली असून शहरात ऐरोली व एमआयडीसी क्षेत्रात १ हजार साध्या खाटांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. ऐरोली येथील लेवा पाटील भवन येथे ३०० व एमआयडीसी क्षेत्रात रहेजा इमारतीत १००० साध्या खाटांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

नवी मुंबई शहरात आरोग्यसेवा करोनाकाळापुरतीच नव्हे तर असलेल्या इमारतींचा सुयोग्य व पुरेपुर वापर आरोग्यसेवेसाठी करण्याचे नियोजन आहे. शहरात करोनाच्या स्थितीसाठी १००० प्राणवायूयुक्त खाटा निर्माण केल्या आहेत. ऐरोली व एमआयडीसी क्षेत्रातही नियोजन आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त

२८९ करोनाबाधितांची नोंद

* नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या २६ हजार पार झाली असून करोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे. सोमवारी २८९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे.

* मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या २६ हजार १४९ झाली आहे. सोमवारी सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ५८८ झाली आहे. आतापर्यंत एकूण २२,१०८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर ३ हजार ४५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण १ लाख २९ हजार ४४८ जणांच्या चाचण्या  करण्यात आल्या असून करोनामुक्तीचा दर ८५ टक्के आहे.