शेवटच्या तीन महिन्यांत ४०० कोटींचा भरणा

नवी मुंबई : करोना संकटामुळे पहिले नऊ महिने मालमत्ता करापेटी फक्त १४० कोटी रुपये वसूल झाले होते. मात्र गेल्या तीन महिन्यांत नवी मुंबईकरांनी या करापोटी ४०० कोटींचा भरणा केला आहे.  त्यामुळे वर्षभरात ५४० कोटी ६६ लाखांची वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे. यात अभय योजनेचाही मोठा फायदा झाला असून या योजनेंतर्गत १५९ कोटींची वसुली झाली आहे.

गेले वर्षभर करोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीवर मोठा परिणाम दिसून आला. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत या करापोटी फक्त १४० कोटी रुपये वसूल झाले होते. त्यामुळे पालिका प्रशासनापुढे चिंता होती.

यानंतर प्रशासनाने थकीत मालमत्ता करधारकांसाठी अभय योजना जाहीर केली. यामुळे गेल्या तीन महिन्यांत ४०० कोटींहून अधिक रक्कम वसूल झाली आहे. त्यात ३० व ३१ मार्च या शेवटच्या दोन दिवसांत ४६ कोटी ४२  लाख ७९ हजार १८५ इतकी रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे १ एप्रिल ते ३१ मार्च या काळात मालमत्ता करापोटी ५४० कोटी ६६ लाख १३ हजार ७४२ रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. करोनाकाळातही नवी मुंबईकरांना चांगला करभरणा केला असल्याने पालिका आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

अभय योजनेचा फायदा

मालमत्ता करापोटी मोठी थकबाकी असल्याने पालिका प्रशासनाने १५ डिसेंबर ते १५ मार्चपर्यंत थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के सवलत व १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत ५० टक्के सूट देण्यात आली होती. याचा लाभ घेत ७८ कोटी ८६ लक्ष ६३ हजार ७५९ इतक्या रक्कमेची सवलत अभय योजनेंतर्गत नागरिकांना मिळाली आहे. त्यामुळे अभय योजनेंतर्गत प्रत्यक्ष जमा रक्कम व अभय योजनेंतर्गत सूट मिळालेली रक्कम यांचा एकत्रित विचार करता २३८ कोटी २ लाख ९३ रक्कमेची अभय योजनेंतर्गत अप्रत्यक्ष वसुली झाली आहे.