विकासकामांमुळे निर्यात मासळीची प्रत वाढणार
मुंबईमधील ससून डॉक हे राज्यातील मच्छीमारांचे खरेदी-विक्रीचे मुख्य केंद्र असून या बंदराची दुरवस्था झाली आहे. या बंदरातून निर्यात करण्यात येणाऱ्या मासळीवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्याची प्रत सुधारून बंदराचा विकास करावा यासाठी मुंबई बंदराकडून ससून डॉकच्या विकासासाठी नौकानयन मंत्रालय व कृषी विभागाच्या माध्यमातून ६० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या निर्णयामुळे मच्छीमारांच्या समस्या सुटण्यास मदत होणार असून मच्छीमारांनी आनंद व्यक्त केला आहे.
मच्छीमारांनी केलेल्या मागणीनुसार ससुन डॉकचा विकास करण्याचे संकेत केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. त्याचा पाठपुरावा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी मुंबई बंदराचे अध्यक्ष रवी परमार यांच्याकडे केला होता. त्यानुसार मंगळवारी विकास निधी मंजूर झाल्यानंतर मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह मुंबई बंदराच्या अभियंत्यांनी बंदराची पाहणी केली. राज्यातून मत्सव्यवसाय विभागाअंतर्गत मासळीची निर्यात करण्यासाठी मासळीवर प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी लागणारी स्वच्छता व उपकरणे नसल्याने युरोपीय देशातील मागणी घटली आहे. निर्यातीसाठी स्वच्छ व आरोग्यदायी यंत्रणा उभी करणे, बंदरातील मासेमारी बोटीसाठी सुविधा, मासळी साठवणुकीसाठी सोय तसेच बंदराची डागडुजी या निधीतून करण्यात येणार आहे. मच्छीमारांनी ससून डॉक येथील समस्या घेऊन अनेक आंदोलने केली आहेत. मात्र नव्या सरकारने बंदराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने करंजा मच्छीमार सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी नौकानयन मंत्र्यांचे आभार मानले आहेत.