एकूण ३०० प्रकल्प; दहा लाखांपासून ते एक कोटीपर्यंत किंमत

महामुंबई क्षेत्रात घर घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून शुक्रवारपासून वाशी येथे सुरू झालेल्या मालमत्ता प्रदर्शनात छोटय़ा घरांचे प्रकल्प सर्वाधिक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकूण ८० विकासकांच्या सुमारे तीनशे प्रकल्पांत ६० टक्के प्रकल्प छोटय़ा घरांचे आहेत. शिल्लक चाळीस टक्केमध्ये मध्यम, अल्प उत्पन्न व उच्च उत्पन्न नागरिकांसाठी पर्याय खुले ठेवण्यात आलेले आहेत.

परवडणाऱ्या घरांची व्याख्या अलीकडे बदलली असल्याने नेरुळ, बेलापूर येथेही छोटी घरे बांधली जाणार आहेत पण त्यांची किंमत एक कोटीपर्यंत राहणार आहे.

पश्चिम व मध्य रेल्वे मार्गापेक्षा अलीकडे हार्बर मार्गावरील पनवेल, तळोजा, खारघर, कामोठे, द्रोणागिरी, उलवा, नवीन पनवेल, करंजाडे, या विकसित विभागात घराचे स्वप्न व आयुष्यांची कमाई गुतंवणूक म्हणून लावणारे नागरिक मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे सिडकोने नुकत्याच काढलेल्या सोडतीत १४ हजार घरांसाठी एक लाख ९१ हजार मागणी अर्ज आले होते. या मागणीचा फायदा नवी मुंबईतील विकासकांनी उचलण्याचा निर्णय घेतला असून महामुंबई क्षेत्रात दहा लाखांपासून ते एक कोटीपर्यंत घरांची निर्मिती करण्याचे प्रकल्प जाहीर केले आहेत.

शुक्रवारपासून वाशी येथील सिडकोच्या पदर्शन केंद्रात महामुंबई क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे प्र्दशन लावण्यात आले असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी या प्र्दशनांना भेटी देणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे असा दावा बिल्डर असोशिएन ऑफ नवी मुंबई या आयोजक संस्थेने केला आहे. १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन केलेले आहे. तेव्हापासून इतके दिवस कागदावर असलेला प्रकल्प प्रत्यक्षात उतरू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे महामुंबई क्षेत्रात भविष्याचा विचार करून गंतवणूक करणाऱ्यांची सख्या वाढली आहे. पहिल्या सात महिन्यांत ही संख्या १० टक्क्यांनी वाढली असून पुढील चार महिन्यांत यात भर पडणार असल्याचा गुंतवणूक सल्लागारांचा दावा आहे. दिवाळीनंतर उरणपर्यंत जाणारी नेरुळ-उरण रेल्वे सेवा खारकोपपर्यंत सुरू झाली आहे. त्यामुळे उलवा, द्रोणागिरी, उरण या भागात घर घेणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त आहे.

सर्वाधिक पंसती खारघर नोडला

महामुंबई क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे विकासकांनी छोटी घरे बांधणीवर भर दिला असून १८० प्रकल्प या घरांचे आहेत. यात सर्वाधिक पंसती खारघर नोडला आहे.

भविष्य निवार्ह निधी अथवा इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा बांधकाम क्षेत्रात केलेली गुंतवणूक ही सर्वात फायदेशीर मानली जात आहे. त्यामुळे मुंबईत राहणारे नागरिकही नवी मुंबईत दुसरे घर घेत असून त्याचा परतावा पुढील काही वर्षांत कोटय़वधीमध्ये राहणार आहे. या पैशातून सर्वसामान्य नागरिकही आपल्या सर्व गरजा भागवू शकणार असून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणार आहे. त्यामुळे मालमत्ता प्र्दशनात विकासकांनी छोटय़ा घरांवर भर दिला आहे.

– हरेश छेडा, अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई