२०२० वर्षांत १५१ प्रकरणांत समुपदेशनातून तोडगा

नवी मुंबई : कधी अगदी क्षुल्लक तर कधी गंभीर कारणावरून पती-पत्नीमधील वादाच्या २०२० या वर्षांत ६३३ तक्रारी पोलिसांच्या महिला समुपदेश केंद्राकडे आल्या होत्या. त्यातील १५१ तक्रारी निवारणात या कक्षाला यश आले असून त्यांचे संसार सुरळीत होण्यास मदत झाली आहे. यात आता पतींच्या तक्रारीही वाढत असल्याचे दिसत आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम. मात्र याव्यतिरिक्त अनेक अघाडय़ांवर पोलीस काम करीत असतात. पती-पत्नीमधील वाद आणि यातून होत असलेले घटस्फोट हा एक गंभीर प्रश्न असून यात वाढ होत असल्याने पोलीस समुपदेशनाच्या माध्यमातून हे वाद मिटविण्याचे काम करीत असतात. यासाठी पोलीस विभागात खास महिला कक्ष असतो. महिला अत्याचार, पती-पत्नी भांडणे आदी घरगुती वादही सदर विभागात सोडवले जातात. त्यांचे समुपदेशन केले जाते. नवी मुंबई पोलीस कार्यक्षेत्रात २०२० वर्षांत अशी  ६३३ तक्रारी या महिला कक्षाकडे आल्या होत्या. यातील १५१ तक्रारींत समुपदेशनाद्वारे मार्ग काढण्यात या कक्षाला यश आले असून त्यांचे संसार पुन्हा सुरू झाल्याचे समाधान असल्याचे या कक्षाच्या

साहाय्यक मीरा बनसोडे यांनी सांगितले. पती-पत्नीतील वादात सर्वात मोठा अडथळा असतो तो त्यांचा अहंपणा. हा अहंपणा दूर करण्यात यश आले की अनेक वाद मिटतात, असेही बनसोडे यांनी सांगितले.

तक्रारींचे स्वरूप

पतीचे मद्यप्राशन, सतत भांडण, अनैतिक संबंध,सासू-सासऱ्यांचा त्रास, पतीच्या नातेवाईकांकडून टोमणे, स्त्री-स्वातंत्र्य आदी महिलांच्या तक्रारी असतात. तर पुरुषांच्या तक्रारींमध्ये बायको सतत मोबाइलमध्ये व्यस्त असणे, मुलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष, आई-वडिलांची काळजी न घेणे या तक्रारी प्राधान्याने असतात.

पती-पत्नीमधील वादातून कुटुंबच उद्ध्वस्त होते. यात त्यांच्या अपत्यांवरही दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे समुपदेशनातून ते वाद मिटवण्याचा आमचा प्रयत्न असतो. एकमेकांच्या चांगल्या आणि वाईट गुणांसह एकमेकांना स्वीकारणे गरजेचे आहे, कोणीही १०० टक्के ‘परफेक्ट’ नसते. संसार वाचावा हा आमचा प्रयत्न असतो, शेवटी निर्णय त्यांचा असतो.

मीरा बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (महिला साहाय्य कक्ष)