दोन्ही मतदारसंघात मतदार वाढल्याने इच्छुकांचे लक्ष

नवी मुंबई : नवी मुंबईत इच्छुकांनी पेरणी सुरू केली असून त्यांची प्रारूप मतदार यादीकडे लक्ष लागून आहे. १६ फेब्रुवारी रोजी ही यादी प्रसिद्ध होणार आहे. महापालिका क्षेत्रात ९ लाखांहून अधिक मतदार असून बेलापूर व ऐरोली दोन्ही मतदारसंघांत ६३,७७१ नवीन मतदार वाढले आहेत. या वाढीव मतदारांची विभागणी प्रारूप मतदार यादीत कशी होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला असून शहरात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. गेल्यावर्षीच पालिका निवडणूक होणार होती, परंतु करोना संकटामुळे शासनाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती. आता निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत, मात्र पालिका प्रशासनाला निवडणूकपूर्व तयारीचे तोंडी आदेश दिले आहेत.

१५ जानेवारी २०२१ पर्यंतची मतदार यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार असून त्यानुसार ९ लाख ७ हजार २२ मतदार असणार आहेत. मात्र आपल्या प्रभागात पूर्वीचे व नवीन मतदार कोण असतील हे प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून आहे. पालिका निवडणुकीत १११ प्रभाग असून बेलापूर मतदारसंघात ५८ तर ऐरोली मतदारसंघात ५३ प्रभाग असणार आहेत. बेलापूर मतदारसंघात २९ हजारांहून अधिक तर ऐरोली मतदारसंघात ३४ हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे प्रभागनिहाय मतदार याद्या बनवल्या जात असून त्यावर विविध पक्षांचे लक्ष आहे.

मंगळवारी कोणत्या प्रभागात कोणते मतदार हे स्पष्ट होणार आहे. आपल्या प्रभागात किती मतदार आहेत. मतदार याद्यांमध्ये इतर विभागाची मते समाविष्ट झाली आहेत का याची उत्सुकता असते. याच मतदारांच्या मतावंर इच्छुक निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे शिवसेनेचे विभागप्रमुख समीर बागवान यांनी सांगितले.

२३ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. या दरम्यान येणाऱ्या सुट्टीच्या दिवशीही हरकती व सूचना दाखल करता येतील, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

मतदार संख्या

          बेलापूर             ऐरोली

पुरुष : २,२१,६३९        पुरुष : २,८३,८१७

महिला : १,८९,८२६      महिला :  २,११,६९७

इतर :  ७                      इतर : ३६

एकूण : ४,११,४७२       एकूण :  ४, ९५,५५०

नोंदणी कार्यक्रमानुसार आलेल्या अर्जाची छाननी करून नवीन मतदारांची नावे नियमानुसार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. दोन्ही मतदारसंघात मतदारांची वाढ झाली आहे.

-ज्ञानेश्वर खुटवड, मतदार नोंदणी अधिकारी