नवी मुंबई पालिका क्षेत्रातील ६७ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ४१ हजार विद्यार्थ्यांना यंदा आणि पुढील वर्षी देण्यात येणाऱ्या शालेय साहित्य दरामध्ये अवाजवी केलेली दरवाढ प्रशासनाने ६५ टक्यांपर्यंत कमी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रेनकोट, बूट, मोजे आणि दप्तर यात गेली अनेक वर्षे लुटमार केली जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पालिका या साहित्यावर दोन वर्षांसाठी ३४ कोटी रुपये खर्च करणार होती. शिवसेनेचे वाशीतील नगरसेवक किशोर पाटकर यांनी हे शालेय साहित्यामधील अवाजवी दर आणि निकृष्ठ दर्जा एप्रिल महिन्याच्या महासभेत चव्हाटय़ावर आणला होता.

नवी मुंबईतील पालिकेच्या शाळेतील पटसंख्या दर वर्षी वाढत आहे. याउलट मुंबई, पुणे या शहरातील ही पटसंख्या घटत आहे. शालेय शिक्षण पोषण आहार व सर्व शिक्षा अभियानांतर्गत पालिकेच्या ६७ शाळांत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खाण्यासाठी मोफत चिक्की पावसाळ्यात रेनकोट, बूट, दप्तर, वह्य़ा-पुस्तके, दिली जात आहेत. या वर्षी व पुढील वर्षांसाठी हे साहित्य घेण्यासाठी पालिकेने ३४ कोटी रुपये मंजूर केले होते. एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे पाटकर यांनी या साहित्यावर निकृष्ट व अवाजवी दराचा आरोप केलेला असताना महापौर सुधाकर सोनावणे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला होता. त्या वेळी या दरांची चौकशी करण्याची मागणी पाटकर यांनी केली होती. तीन महिन्यांपूर्वी पालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सांभाळलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दरारा पाहता शिक्षण विभागाने हे दर ६५ टक्यांपर्यंत खाली आणले आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे चढे दर आकारून या साहित्य खरेदीत पालिकेची आर्थिक लुटमार केली जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या अंतर्गत आता बडय़ा व नामांकित कंपन्यांचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.