आठवडाभरात अपघातांत सात जणांचा मृत्यू

उरण-पनवेल व बंदर परिसरात या आठवडय़ात झालेल्या अपघातात सात दिवसांत आठ जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये बहुतेक जण दुचाकीस्वार आहेत. महिनाभरात जेएनपीटी ते गव्हाण फाटा व जेएनपीटी ते पळस्पे फाटा या उरण व जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या दोन्ही महामार्गावर झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला आहे.

जड वाहनांच्या धडकेने होणाऱ्या अपघातात दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारही जबाबदार असल्याची जोरदार चर्चा आहे. असे असले तरी अपघातात मरणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराचीच चूक असते का, असाही सवाल आता अपघातात गमावलेल्या कुटुंबियांकडून केला जात आहे. बंदर विभागात सध्या दिवसाला ६० ते ७० हजारांहून अधिक जड वाहनांची ये-जा होत आहे. या वाहनांची वाढती संख्या व त्यांच्यासाठी आवश्यक असणारे रस्ते या परिसरात नाहीत. त्यामुळे याच मार्गावरून दुचाकी वाहनधारकांनाही प्रवास करावा लागत आहे. बुधवारी उरण परिसरात झालेल्या तीन अपघातात विष्णू रामबहाद्दूर तुवर(१८)याचा दिघोडे येथे, दशरथ सोपान आंबावडे (२५)कॉन्टीनेंटल द्रोणागिरी नोड तर अतुल भाटले(४५)याचा चिर्ले हायवे येथे दुचाकीवरून जात असताना अपघात झाला.तर जासई रेल्वे क्रॉसिंग, जासई, गव्हाण फाटा येथेही चार अपघात झाले. यामध्ये आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही संख्या मागील पंचवीस वर्षांत शेकडोंच्या घरात गेली आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याची मागणी येथील नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. त्यासंदर्भात जेएनपीटी, सिडको, हायवे विभाग तसेच वाहतूक विभाग यांच्या उच्चस्तरीय बैठकाही झाल्या त्यात काही निर्णय घेण्यात आले. मात्र त्याची झालेली नाही. यासाठी १ मे रोजी उरण सामाजिक संस्थेने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले होते. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जेएनपीटीच्या विरोधात संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या २६ मे रोजी अपघातांविरोधात आंदोलन केले जाईल. त्यासाठी गावोगावी बैठकांना गुरुवारपासून सुरुवात झाल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष भूषण पाटील यांनी दिली.