धास्तीने ग्राहकांची खरेदीकडे पाठ; अनेक ठिकाणी वादावादी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिके ने शहरातील मॉलमध्ये शुक्रवारी सायंकाळी चार वाजलेपासून रविवारी रात्रीपर्यंत अभ्यगतांच्या चाचण्या बंधनकारक केल्या असून शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. पण पहिला दिवस गोंधळाचाच ठरला. अनेक ठिकाणी चाचणी करावी लागेल, असे लक्षात येताच मॉलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांनी पाठ फिरवली तर काही ठिकाणी हुज्जत, वादावादी याचाही सामना चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करावा लागला. ७० टक्के ग्राहक परत गेल्याचे काही मॉल व्यवस्थापनांनी सांगितले.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मॉलमध्ये येणाऱ्यांची प्रतिजन चाचणी या निर्णयाची अंमलबजावणीचा शुक्रवारी पहिला दिवस होता. शहरातील सर्वच मॉलबाहेर पालिकेने करोना चाचणीची व्यवस्था केली असून १२ पथकांद्वारे  चाचणी केल्यानंतरच मॉलमध्ये प्रवेश दिला जात आहे.

याबाबत अनेकांनी यावेळी नाराजीही व्यक्त केली. तर काहींना ही कटकट नको असे म्हणत परत माघारी फिरणे पसंत केले. काही जणांनी सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातली. ज्यांना मॉलमध्ये जायचे होते, त्यांनी रांगा लावून करोना चाचणी करून घेतली. मॉलच्या प्रत्येक प्रवेशद्वार व पार्किंगच्या ठिकाणाहून मॉलमधील प्रवेशद्वारावरही चाचणी केली जात होती. याचा मोठा परिणाम झाल्याचे मॉल व्यवस्थापनाने सांगितले. सुमारे ७० टक्के ग्राहक परत गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी प्रतिजन चाचण्यांबरोबर आरटीपीसीआर चाचण्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना आरटीपीसीआर चाचणी करायची असेल त्यांची ते केली जात आहे. प्रतिजन चाचणीचा अहवाल अर्धा तासात दिला जात असून त्यांनतर ग्राहकांना मॉलमध्ये सोडले जात आहे. तर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल २४ तासानंतर नेरुळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात प्राप्त होणार आहेत.

६१० नवे बाधित

नवी मुंबई :  शहरात  शुक्रवारी ६१०  नवे करोनाबाधित आढळले  तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची संख्या  ६२,२८६  इतकी झाली आहे. शुक्रवारी २७६  जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत ५६,६३२  जण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधिन रुग्ण ४,४९४  इतके आहेत. तर एकूण मृत्यू  झालेल्यांची संख्या ११६० इतकी झाली आहे.

पालिकेकडून करोना चाचणी करण्यात येत आहे. यामुळे आज पहिल्याच दिवशी ७० टक्के ग्राहक परत गेले. रघुलीला मॉलमध्ये एका तासात ६५ जणांची चाचणी करण्यात आली तर त्यात दोन जणांची चाचणी सकारात्मक आली. चाचणी अनिवार्य करण्यात आल्याने व्यवसायावर नक्कीच परिणाम होणार आहे.

संदीप देशमुख, रघुलीला मॉल वाशी, संपर्कप्रमुख