सोसायटीती स्वागत; नवी मुंबईत दोन रुग्णांची भर

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी काहीसे आशावादी चित्र दिसत आहे. एक तर सोमवार, मंगळवार हे दोन दिवस एकही नव्या रुग्णाची भर पडली नाही, तर बुधवारी कोपरखरणेत दोन रुग्ण समोर आले, मात्र ते करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व घरातील आहेत. त्यात सीवूड्स येथील ७२ वर्षीय करोनाबाधित रुग्णाने करोनाशी लढा जिंकला आहे. त्यांच्या तपासण्या नकारात्मक आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून सोसायटीतील रहिवाशांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

तसेच करोनाबाधित गरोदर महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिच्या बालकाची करोना चाचणीही नकारात्मक आली आहे.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत करोनाचे रुग्ण वाढत असल्याने मोठी चिंता आहे. नवी मुंबईत रविवापर्यंत करोनाबाधित २८ रुग्णांची संख्या ही २८ वर गेली होती. त्यामुळे पालिका प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंता होती. मात्र सोमवार व मंगळवार दोन दिवस एकही नवा रुग्ण न सापडल्याने नवी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यात देशात टाळेबंदीला चौदा दिवसही पूर्ण झाले आहेत. अलगीकरणाचे चौदा दिवस पूर्ण झाली आहेत. त्यात शहरात गेल्या दोन दिवसांत नव्याने रुग्ण नसल्याने प्रशासनासह नागरिकांत आशेचा किरण निर्माण झाला आहे.

बुधवारी दोन नव्या रुग्णांची यात भर पडली आहे. मात्र हे दोन्ही रुग्ण कोपरखरणे येथील करोनाबधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

शहरात १८० नागरिकांची करोनाची चाचणी केली असून ३० जणांचे अहवाल सकारात्मक आले असून १२५ जणांचे अहवाल नकारात्मक आहेत. २५ जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. यातील पाच जणांचे अहवाल आधी सकारात्मक होते. उपचारानंतर ते रुग्ण बरे झाले आहेत.

मागील दोन दिवसात नवी मुंबई शहरात करोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता, उलट ७२ वर्षीय  करोनाबाधित ज्येष्ठ नागरिकावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पालिका मोठय़ा प्रमाणात नागरिकांचे सर्वेक्षण करत आहे. नवीन दोन रुग्ण मिळाले असले तरी ते एकाच घरातील संपर्कातील आहेत.

 – अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त