तीन दिवसांनंतर मृतदेह सापडला

नवी मुंबई : गटारावर झाकण नसल्याने त्यात पडून एका ८ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नेरुळ विभागात घडली असून मुलाचा मृतदेह सारसोळे जेट्टी परिसरात तिसऱ्या दिवशी आढळून आला.

११ स्पटेंबर रोजी मोठा पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्वच पावसाळी गटारे वाहात होती. दरम्यान शिरवणे येथे राहणारा आठ वर्षीय अनिकेत दिलीप सिंग हा घरातून दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला तो परत आलाच नाही. अनिकेत येथील मिनी महल या हॉटेलनजीक असलेल्या पावसाळी गटारावरून जात असताना झाकण नसल्याने गटारात पडला. हे येथील काही नागरिकांनी पहिले होते. त्यानंतर त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो सापडला नाही. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. नेरुळ पोलिसांनीही पावसाचा जोर कमी झाल्यावर गटारात उतरून त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडलाच नाही, अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली.

घटनेच्या तिसऱ्या दिवशी १३ सप्टेंबरला सकाळी ११ च्या सुमारास सरसोळे जेट्टी परिसरात मासेमारी करत असताना एका मच्छीमारास अज्ञात मृतदेह आढळून आला. याबाबत त्याने नेरुळ पोलिसांना माहिती दिली. मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मुलाच्या नातेवाईकांनाही बोलावल्यानंतर मृतदेह त्या मुलाचाच असल्याचे समोर आले.