शहरात १,३२८ रुग्ण उपचाराधीन

नवी मुंबई : दिवाळीनंतर वाढलेली करोनाबाधितांची संख्याही आता परत कमी झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ही १,३२८ पर्यंत मर्यादित राहिली आहे. त्यामुळे शहरात करोना रुग्ण व अंशत: बाधितांसाठी नियोजित केलेल्या ५०१६ खाटांपैकी ४०१२ म्हणजे ८० टक्के खाटा आता शिल्लक आहेत.

गणेशोत्सव व दिवाळीनंतर शहरात करोना रुग्णांत वाढ झाल्याने खाटांची मागणी वाढली होती. प्राणवायू असलेल्या खाटा अधिक होत्या. मात्र अत्यवस्थ रुग्णांना खाटा उपलब्ध होत नव्हत्या.  दिवाळीपूर्वी पालिका प्रशासनाने सिडको प्रदर्शनी केंद्र व कामगार विमा रुग्णालयात अतिदक्षता खाटा व कृत्रिम श्वसन यंत्रणा उभारण्याचे नियोजन केले होते. मात्र दिवाळीपूर्वी करोना रुग्णांची संख्या शहरात नियंत्रणात आली होती. दररोजचे रुग्ण हे शंभरच्या खाली आले होते. तसेच उपचाराधीन रुग्णही एक हजाराच्या खाली आले होते. त्यामुळे पालिकेने आपली काळजी केंद्रे बंद करीत शहरातील चार ठिकाणीच करोना रुग्णांवर उपचार सुरू ठेवले होते. अतिदक्षता खाटांचीही गरज कमी झाल्याने पालिकेने ते नियोजनही पुढे ढकलेले होते. मात्र दिवाळीनंतर परत करोना रुग्णांत वाढ झाली होती. सतत पंधरा दिवस रुग्णवाढ होत होती. त्यामुळे बंद केलेली काळजी केंद्रे व अतिदक्षता खाटांचे नियोजन पालिकेला करावे लागणार होते.

मात्र त्यानंतर पुन्हा करोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. त्यामुळे शहरात विविध प्रकारच्या एकूण ५ हजार ०६१ खाटा असून त्यापैकी ४०१४ खाटा शिल्लक आहेत. हे प्रमाण एकूण गाटंच्या तुलनेत ८० टक्के इतके आहे.

शहरातील करोनाची स्थिती अत्यंत नियंत्रणात आहे. करोनाचे नवे रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे खाटांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. ८० टक्के खाटा रिकाम्या आहेत. – संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त