वाशी बाजारातील आवक वाढल्याने किमती आणखी कमी होण्याची शक्यता

नवी मुंबई एपीएमसीच्या घाऊक फळ बाजारात सोमवारी हापूस आंब्याची विक्रमी आवक झाली. रात्री उशिरापर्यंत हापूस आंब्यांच्या गाडय़ा रित्या करण्याचे काम सुरू होते. कोकणातील तयार हापूस आंब्यांच्या ८० हजारांपेक्षा जास्त पेटय़ा एपीएमसीत दाखल झाल्या. कर्नाटक व गुजरातमधील आंब्यांचीही काही प्रमाणात आवक झाली. ही आवक किरकोळ असली तरी पुढील आठवडय़ात ती वाढण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.

हापूस आंब्याचे गणित यंदा कोलमडले आहे. अक्षय्य तृतीयेपासून वाढणारी आवक यंदा १५ दिवस उशिरा वाढली. मे महिन्यात आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात अन्न व औषध विभागाने हापूस आंबा बाजारात छापे टाकून इथिलिन फवारलेले हापूस आंबे तपासणीसाठी जप्त केले. त्यानंतर गेल्या आठवडय़ात हापूसला असलेली मागणी खुंटली होती. त्यामुळे आंब्यांचे दर घटले. त्यातच रविवारी घाऊक बाजार बंद होता. त्यामुळे सोमवारी आंब्यांच्या सुमारे एक लाख पेटय़ा बाजारात आल्या. कर्नाटकातील आंब्यांच्या १५-२० हजार पेटय़ा बाजारात दाखल झाल्या. गुजरातमधील केसरी, बलसार आंब्याची आवक सुरू झाली आहे. ती आणखी वाढून मे महिन्यात हापूसचे दर कोसळण्याची शक्यता वर्तवण्याची शक्यता आहे.

फळ बाजारात हापूस आंब्याची मोठय़ा प्रमाणात आवक झाली आहे. शनिवार व सोमवारी आवक जास्त असते पण यंदा इतर राज्यांतील आंबेदेखील मोठय़ा प्रमाणात येत आहेत. मेमध्ये आवक आणखी वाढेल व भाव कमी होतील. त्यामुळे सर्वसामान्यांना हापूस आंबे खाणे परवडणार आहे.

– संजय पानसरे, माजी संचालक, व्यापारी, एपीएमसी, फळ बाजार