सामान्य, बालरोग विभाग सुरू होणार

नवी मुंबई</strong> : करोना काळात फक्त करोनासाठी असलेल्या वाशी येथील पालिका प्रथम संदर्भ रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून इतर आजारांच्या रुग्णांसाठी बारुग्णसेवेसाठी खुले करण्यात आले होते. पुढील आठवडयापासून या ठिकाणी इतर रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील  रुग्णालय ३०० खाटांचे आहे. यातील १७५ खाटा या करोना रुग्णांसाठी. तिसऱ्या मजल्यावर इतर रुग्णांसाठी ९० खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. जनरल मेडिसीन व बालरोग विभाग सुरू करण्यात येणार असून पुरुष, महिला व लहान मुलांसाठी प्रत्येकी ३० गाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

नवी मुंबईत पालिकेचे हे एकमेव मोठे रुग्णालय आहे. पालिकेची ऐरोली, कोपरखरणे,नेरुळ व बेलापूर येथेही रुग्णालये आहेत. मात्र ती पूर्ण क्षमतेने सुरू राहतील ऐवढी सुविधा व मनुष्यबळ नाही. त्यामुळे वाशी येथील रुग्णालयाचा सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांसाठी मोठा आधार आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर हे रुग्णालय फक्त करोना रुग्णांवरील उपचारासाठी करण्यात आले होते. त्यामुळे या काळात इतर आजारांच्या रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून हे रुग्णालय इतर आजारांसाठी खुले करावे अशी मागणी होत होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पालिका प्रशासनाने इतर आजाराच्या रुग्णांसाठी बारुग्ण्सेवा सुरू केली होती. आता रुग्ण दाखल करण्याची सुविधाही करण्यात येत आहे. ३०० खाटांपैकी ९० खाटा या सामान्य रुग्णांसाठी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इतर आजारांच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

वाशी येथील करोना रुग्णालय पुन्हा सामान्य आजारांच्या रुग्णासाठी खुले करावे अशी मागणी होत आहे. याच आठवडय़ात ९० खाटांचे सामान्य रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात करोनासाठी १०० खाटांचे वाढीव नियोजन आहे. त्या मिळताच या ठिकाणी ही सेवा सुरू होईल.

 -अभिजीत बांगर, आयमुक्त, महापालिका

खासगी रुग्णालयांत उपचार महाग

वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे महापालिका प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित केल्याने इतर आजाराच्या रुग्णांची गैरसोय वाढत आहे. खासगी रुग्णालयात इतर आजारांच्या रुग्णांना खाटा शिल्लक नसल्याचे कारण देत रुग्ण दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत आहे. एकतर खाटा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यातून रुग्ण दाखल झाला तर उपचारानंतर भरमसाठी देयके दिले जात आहे. डेंग्यूसारख्या आजारासाठी अवघ्या दोन-तीन दिवसांसाठी ३० ते ४० हजारांचा उपचार खर्च होत आहे.