नवी मुंबई महापालिकेचा उपक्रम, सर्वसाधारण सभेत मंजुरी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधील ९ वी व १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अन्नमित्र फांऊडेशन’च्या वतीने माध्यान्ह भोजन पुरवण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी सर्वसाधरण सभेच्या मंजुरीसाठी पटलावर ठेवला असता, त्याला सर्वानमुते मंजुरी देण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार देण्यात येतो. परंतु ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना शासन किंवा पालिकेच्या वतीने आहार पुरविण्यात येत नाही. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील विद्यार्थी हे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील असून त्यांचे पालक मजुरी करणारे आहेत. त्यांना योग्य आहार मिळवा यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने माध्यान्ह आहार पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना उसळ-खिचडी, वरण-भात, भाजी-चपाती, सांबर-भात, पुलाव हे पदार्थ दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांगणिक वस्तू सेवा करासह (जीएसटी) १३ रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका शाळांमध्ये ९ वी, १० वीच्या विद्यार्थ्यांची संख्या ५ हजार ९९ आहे. या विद्यार्थ्यांसाठी ९८ लाख ५५ हजार ५५२ रुपये खर्च  होणार आहे.