|| संतोष जाधव

santoshnjadhav7@gmail.com

readers comments on loksatta editorial
लोकमानस : निरुपयोगी शिक्षणात वेळ घालवण्याची परंपरा
master of human capital management and employee relations affiliated to mumbai and nagpur university
शिक्षणाची संधी : एचआर’मधील संधी
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

संस्था-आम्ही उद्योगिनी

सर्वसामान्य महिलांना स्वयंरोजगारातून उद्योजक होण्याचे सामथ्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने २१ वर्षांपूर्वी मीनल मोहाडीकर यांनी मुंबईमध्ये ‘आम्ही उद्योगिनी’ ही संस्था सुरू केली. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या आणि नावीन्याची ओढ असलेल्या, उद्योग करण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांची मोट त्यांनी बांधली. शुभांगी तिरोडकर या संस्थेतील महत्त्वपूर्ण घटक होत्या. संस्थेची स्थापना झाल्यापासून नियमितपणे महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दादर येथील साने गुरुजी विद्यालयात महिलांना स्वयंरोजगारासह उद्योजक बनवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते. नवी मुंबईतील महिलांनाही या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा म्हणून शुभांगी तिरोडकर अनेक महिलांना दादर येथे घेऊन जात. त्यानंतर तिरोडकर यांनी ‘आम्ही उद्योगिनी’ची पहिली शाखा नवी मुंबईतच वाशी येथे सिडकोच्या जुन्या समाजमंदिरात सुरू केली. नवी मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ही शाखा सुरू करण्यात आली.

वाशी येथे महिलांना शिवणकामाचे ससमिराचे शासनमान्य प्रशिक्षण दिले जाते. तिरोडकर या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्ष आहेत. सिमेंट व्यवसायात घेतलेल्या भरारीमुळे त्या ‘सिमेंट लेडी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. सुरुवातीला नवी मुंबईतील महिलांना प्रेरित करून महिलांनीच केलेल्या वस्तूंची प्रदर्शने ठाणे व नवी मुंबई तसेच विविध ठिकाणी भरवली जात. संस्था महिलांना स्वयंरोजगार व स्वयंनिर्मितीची अखंडपणे प्रेरणा देत आहे. उद्योग सुरू करून यशस्वी झालेल्या महिलांचा ‘घे भरारी’ हा गट त्यांनी स्थापन केला.

‘सबला शक्ती महिला बचत गटा’च्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेकडे हजारो महिलांची नोंद करण्यात आली आहे. प्रदर्शने भरवण्यात येतात. नेटवर्किंग, पणनासंदर्भात यात मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न उद्योगिनीच्या नवी मुंबई शाखेद्वारे सातत्याने सुरू आहे. आज राज्यभर प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली असताना आम्ही उद्योगिनीच्या महिला कापडी पिशव्या बनवण्याचा उद्योग यशस्वी करत आहेत. याच ठिकाणी महिलांना शाडूचे गणपती, गौरी, गौरी गणपतीचे अलंकार, एलईडी दिवे इत्यादी उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण मोफत दिले जाते.

आम्ही उद्योगिनीच्या मार्फत गेली अनेक वर्षे सातत्याने राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद आयोजित करण्यात येते. त्यातून लाखो महिलांना मार्गदर्शन केले जाते. व्यवसायाच्या अनेक वाटा उपलब्ध होतात. महिला उद्योजकांना प्रेरणा मिळावी, व्यवसायवृद्धी व्हावी, नवी ऊर्मी मिळावी यासाठी १९९८ पासून ‘आम्ही उद्योगिनी’ पुरस्कार दिला जातो. केवळ उद्योजक महिलांनाच नव्हे तर महिलांच्या विकासाला हातभार लावणाऱ्या पत्रकारांना, आपल्याबरोबरच अनेकांचा विकास करणाऱ्या, मुलामुलींना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी कार्यरत असलेल्या दोन कर्तृत्ववान महिलांनाही दरवर्षी पुरस्काराने सन्मानित केले जाते.

जगभर व्यवसाय

  • आम्ही उद्योगिनीच्या वतीने मुंबईतील विविध उपनगरांत तसेच नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरीसह, गोवा व दुबईतही महिला उद्योजकांच्या शाखा विस्तारित झाल्या आहेत. त्यामुळे समाजामध्ये महिलासांठी प्रेरणादायी काम करणारे ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’ महिलांसाठी प्रेरक ठरले आहे.
  • ‘जिद्द तुमची, साथ आमची.. आम्ही उद्योगिनी’ हे संस्थेचे घोषवाक्य आहे. लाखो महिलांना स्वबळावर उद्योजक होण्याचे सामथ्र्य संस्था देत आहे.