नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी शहरातील चार अल्पवयीन मुलांच्या अपहरण गुन्ह्यांची उकल करीत त्यांची यातून सुटका केली आहे. यात तीन मुली तर एका मुलाचा समावेश आहे. या चारही घटना वेगवेगळया असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने या गुन्ह्यांचा तपास लावला आहे.

घरातून नाराज होऊन निघून गेलेल्या एका सतरा वर्षीय मुलगा रत्नागिरीतील चिपळूण येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याचा शोध घेत त्याला नवी मुंबईत आणण्यात आले. हा मुलगा रबाळे येथे राहणारा आहे. त्याचप्रमाणे एनआरआय पोलीस ठाणे हद्दीतील अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर मुलीची सुटका उदगीर येथून करण्यात आली. तिला गुरप्रीत रेखी याने पळवून नेले होते. याचबरोबर कोपरखैरणे येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून सोलापूर जिल्ह्यातील दादरफळ येथे नेऊन ठेवणाऱ्या अमोल बनसोडे याला ताब्यात घेत मुलीची सुटका करण्यात आली आहे. उरण येथून नागेश जाधव याने एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. या बाबत पोलिसांनी जाधव याचा शोध सुरू केल्यावर तो कर्नाटकमधील हुमनाबाद जिल्ह्यातील हंदीकेरा गावात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी येथे जात त्यालाही ताब्यात घेत मुलीची सुटका केली आहे.

या सर्व चारही अपहरण प्रकरणातील सोडवून आणलेल्या तीन मुली व एका युवकास रविवारी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांनी दिली.