टाळेबंदीमुळे गतवर्षीपेक्षा यंदा निम्मीच मालमत्ता कर वसुली

नवी मुंबई : करोना प्रादुर्भावामुळे या वर्षी पालिकेचे उत्पन्न घटले असून निम्मीच करवसुली झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी गेल्या वर्षी राबविलेल्या अभय योजनेला मुदतवाढ देण्याचे ठरविले आहे. यामुळे थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे.

नवी मुंबई महापालिका आर्थिकदृष्टय़ा सक्षम आहे. पालिकेला देशपातळीवर सलग सहा वर्षे आर्थिक स्थितीचे ट्रीपल प्लस मानांकन मिळाले आहे. तसेच पालिकेकडे ठेवीसुद्धा आहेत. मात्र दुसरीकडे आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी पालिकेच्या उत्पनाचे मुख्य स्रोत असलेल्या एलबीटी व मालमत्ता कर वसुलीवर लक्ष दिले आहे. या वर्षी करोना स्थितीमुळे मालमत्ता कराची वसुली निम्म्यावर आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी १ डिसेंबर ते ३१ डिसेंबपर्यंत ‘अभय योजना’ लागू करण्यात आली होती. ही योजना या वर्षीही राबविण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. थकीत मालमत्ता कर धारकांना दंडात्मक रकमेवर ७५ टक्केपर्यंत सूट मिळणार आहे.

पालिकेत एकाच मालमत्तेवर दुबार बिले असल्यामुळे थकीत मालमत्तेचा फुगवटा २ हजार कोटींपर्यंत गेला असून पालिका स्थापन झाल्यापासून हा देयकांचा घोळ सुरू आहे. शहरात जवळजवळ ३ लाख १५ हजार मालमत्ता कर धारक असून फे ब्रुवारी महिन्यापर्यंतच पालिकेने ५३९ कोटी वसुली केले आहेत. त्यातील अभय योजनेद्वारे १९१ कोटींची वसुली झाली होती. यामुळे पालिका अभय योजना राबविण्याबाबत विचार करत असून त्याबाबतचे नियोजन आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली.

करवसुली कमी

अभय योजनेत ७५ टक्के दंड माफ करून मूळ कर रक्कम व २५ टक्के दंड रक्कम भरण्याची तरतूद आहे. गतवर्षी पालिकेने मालमत्ता करापोटी एकूण ७०० कोटी वसुलीचे लक्ष ठेवले होते. परंतु मार्च महिना करोनात गेल्यामुळे अभय योजनेतून २०२ कोटी तर नियमित मालमत्ता करातून फक्त ३६५ कोटी जमा झाले होते.

मालमत्ता कर वर्षनिहाय वसुली

* २०१६-१७     ६४४ कोटी

*  २०१७-१८      ५३५ कोटी

* २०१८-१९      ४९१ कोटी

* २०१९-२०      ५३७ कोटी (अभय योजनेतून २०२ कोटी वसूल)

* २०२०-२१     १२५ कोटी (ऑक्टोबपर्यंत २५० कोटी वसुली)

मालमत्ता कर या वर्षी कमी प्राप्त झाला आहे. त्यामुळे वसुलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. करोनामुळे खर्चही मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे अभय योजना राबवण्यासाठी लवकरच योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.

अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका