‘अभय’ योजनेतूनही मालमत्ता कराची वसुली कमी होत असल्याने कारवाईचा बडगा

नवी मुंबई : सलग दोन वर्षे अभय योजना लागू करूनही थकीत मालमत्ता कर वसूली होत नसल्याने पालिका प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत केले असून यातील दहा थकबाकीदारांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

नवी मुंबईत मालमत्ताकरापोटी मोठी थकबाकी आहे. यासाठी पालिकेने अभय योजने राबवली आहे. गेली दोन वर्षे ही योजना राबवत यात थकबाकीत ७५ टक्के सवलत मालमत्ताधारकांना दिली जात आहे. मात्र अद्याप वसुली होत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता करावाई सुरू केली आहे.

थकबाकीदारांच्या विभागनिहाय याद्या तयार करण्यात आल्या असून त्यांना वारंवार संपर्क करण्यात येत आहे. त्यानंतर नोटीस दिली जात आहे. तिलाही प्रतिसाद न मिणल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यानुसार पालिका प्रशासनाने १० मोठ्या मालमत्ताकर थकबाकीदारांची बँक खाती गोठविली आहेत. यामध्ये मोराज शॉपींग कॉम्प्लेक्स (सुरेंद्र कौर, बेलापूर), मार्स कन्स्ट्रक्शन्स कं (धनलक्ष्मी.आर, श्रीनिवासन, वाशी), श्री, व सौ. एम.एन.रॉय (वाशी),  मार्क कोल्ड स्टोरेज प्रा. लि., तुर्भे, अक्षर डेव्हलपर्स, तुर्भे, द ड्रेस को ऑप. हौ.सोसा., कोपरखैरणे., स्टार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, घणसोली, अग्रसेन को.ऑप.हौ.सोसा., ऐरोली आदींचा समावेश आहे.  यापुढे मालमत्ताकर वसुलीची कारवाई अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. कोणाच्या तक्रारी असतील तर त्याचा निपटारा प्राधान्याने करावा व कोणतीही नस्ती ठोस कारणाशिवाय ७ दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

२५ दिवसांत २६ कोटी वसुली

या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२० पासून १० जानेवारी २०२१ पर्यंत ३१४ कोटी ४४ लाख ४३ हजार रक्कमेची वसूली झाली आहे. डिसेंबर २०२० महिन्यात १५५ कोटी ८६ लाख रक्कमेची वसुली झाली असून मागील वर्षी डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या १५१ कोटी १२ लाख वसुली झाली होती. १५ डिसेंबर २०२० पासून अभय योजना लागू करण्यात आली असून १० जानेवारी २०२१ पर्यंत २५ दिवसात २६ कोटी ९ लाख रक्कम जमा झाली आहे.