अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई महापालिका

ऑक्टोबरपासून घसरणीला लागलेली करोनाबाधितांची संख्या पुन्हा उसळी घेऊ लागली आहे. एकीकडे जनजीवन सुरळीत करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणांसमोर असताना करोनाचा फैलाव नियंत्रणात ठेवण्याचे खडतर कामही यंत्रणांना करावे लागणार आहे. त्यातच लसीकरण मोहीम आता व्यापक पातळीवर येऊन ठेपली आहे. अशातच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, मतदार याद्यांमधील घोळ आणि पालिकेची आर्थिक स्थिती अशा आव्हानांनाही प्रशासन सामोरे जात आहे. या परिस्थितीत पालिकेचे प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची नेमकी भूमिका काय, उपाययोजना कशा राबवण्यात येत आहेत, हे जाणून घेण्यासाठी आयुक्तांशी केलेली बातचीत..

नवी मुंबईत पुन्हा एकदा करोनाचा पादुर्भाव वाढू लागला आहे, ही संख्या अजून वाढतच जाईल का?

– नवी मुंबई शहरात १० फेब्रुवारीपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे हे सत्य आहे. पालिका करोना नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी करोना नियमावली पाळण्याची आवश्यकता असून करोनाचा प्रादुर्भाव अजून काही दिवस वाढतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनीच खबरदारीने वागायला हवे आणि स्वयंशिस्तीतून पालिकेला सहकार्य करायला हवे.

एकीकडे करोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकरडे लसीकरणाची मोहीम राबवणे ही मोठी जबाबदारी आहे. लसीकरणाबाबत पालिकेची काय तयारी आहे?

नवी मुंबई महापालिकेत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरात सर्वत्रच अडचण निर्माण झाली होती. परंतु पालिकेने लसीकरणाचे नियोजन केले असून शहरात पालिकेची नेरुळ, वाशी, ऐरोली येथील ३ रुग्णालये तसेच ७ खाजगी रुग्णालये येथे लसीकरण सुरू केले आहे. आणखी काही खासगी रुग्णालयांना येत्या दोन ते तीन दिवसांत लसीकरण प्रक्रिया राबवण्यासाठी परवानगी मिळणार आहे. याखेरीज महापालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रांमध्येही लसीकरणाची व्यवस्था निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. या माध्यमातून एकूण ३५ ते ३७ लसीकरण केंद्रे शहरात निर्माण होतील. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसाला १०० जणांचे लसीकरण या हिशेबाने दिवसाला ३७०० ते ४००० नागरिकांचे लसीकरण करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

करोनाविषयी नियम पाळण्यात नागरिकांकडून कुचराई होत आहे. याबाबत कडक कारवाई करण्यासाठी काय नियोजन केले आहे.

– शहरात कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. संबंधित विभाग अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. कारवाईत कसूर झाल्यास विभाग अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणारे सभागृह तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माझे शहर माझी जबाबदारी या भावनेतून नागरिकांनी सामाजिक भान ठेवून सहकार्य करावे.

महापालिका निवडणुका लांबणीवर पडणार आहेत..

– हो. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यभरातील पालिका निवडणुकांच्या नियोजनात अडथळे निर्माण झाले आहेत. याखेरीज मतदार याद्यांबाबतही अनेक हरकती आल्या आहेत. याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, तरीही १५ मेपर्यंत निवडणुका घेता येतील, असे वाटत नाही.

मतदार याद्यांमधील घोळाबाबत वातावरण तापले आहे.

मतदार याद्यांबाबत मोठय़ा प्रमाणात तक्रारी आलेल्या आहेत. परंतु एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात गेली असतील तर त्यात पालिका बदल करू शकते. परंतु नवीन नावे घुसवण्यात आली आहेत. ती वगळण्यात यावीत अशा तक्रारी आल्या आहेत. मतदार याद्यांतील नावे कमी करणे किंवा वाढवणे याबाबतचा सर्व अधिकार उपजिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे याबाबत तेच निर्णय घेऊ शकतात.

स्वच्छ सर्वेक्षणात यंदा किती प्रगती आहे?

गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महापालिकेचा देशात तिसरा क्रमांक आला. त्यामुळे साहजिकच यंदा पहिला क्रमांक मिळवण्याचा निर्धार करूनच प्रशासनाने मोहिमेची आखणी केली. यंदा आपले ब्रिदवाक्यही ‘निश्चय केला, नंबर पहिला’ असे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरात झालेली कामे तुम्ही पाहू शकता.  शहरात स्वच्छतेत अतिशय चांगला बदल शहरात दिसून येत असल्याचा नागरिकांचा अभिप्राय मिळत आहे. अर्थात यंदा क्रमवारीत कोणतेही स्थान मिळाले तरी, या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत निरंतर जागरूकता व्हावी व ती सवयीतूनही प्रकट व्हावी, हा आमचा हेतू आहे. तसे होणे, हेच आमच्या  अभियानाचे यश आहे.

मुलाखत: संतोष जाधव