‘लोकसत्ता अर्थभान’मधून मार्गदर्शन; १७ नोव्हेंबर रोजी वाशी येथे अर्थसाक्षरता उपक्रम

विक्रमी टप्प्यानजीकचा भांडवली बाजार, वाढत्या गंगाजळीचा म्युच्युअल फंड उद्योग, सावरत्या दराचा सराफा बाजार, स्थिर किमतीतील गृहनिर्माण क्षेत्र अशी अर्थस्थिती असताना जोखीमरहित व आकर्षक परतावा देणारी गुंतवणूक कोणती याबाबतचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थभान’ गुंतवणूक उपक्रमात होणार आहे. वाशी येथे येत्या रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल. या निमित्ताने उपस्थितांसाठी गुंतवणूकविषयक शंकांच्या निरसनाची संधी आहे.

‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ या गुंतवणूकपर उपक्रमाच्या नव्या पर्वातील पहिले सत्र नवी मुंबईकरांसाठी आयोजित करण्यात आले आहे. रविवार, १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. तसेच यासाठी काही जागा निमंत्रितांकरिता राखीव ठेवण्यात येणार आहेत.

भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सध्या त्यांच्या विक्रमानजीक प्रवास करत आहेत. तसेच ऐन सण-समारंभातही तुलनेत मौल्यवान धातूंच्या दरात स्वस्ताई आहे. देशातील फंड प्रकारातील गुंतवणुकीचा ओघ सातत्याने वाढत आहे. आणि स्थावर मालमत्तेच्या किमतीही स्थिर आहेत. असे विविध पर्याय असताना निर्धोक गुंतवणुकीसाठी सद्य:स्थितीत कोणता मार्ग निवडावा, याबाबत या कार्यक्रमात उपस्थित गुंतवणूकदारांना मार्गदर्शन होईल.

आर्थिक सल्लागार तृप्ती राणे या ‘म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ’ या विषयाद्वारे एकूणच फंड क्षेत्राचा आढावा घेताना फंडांचे प्रकार, त्यातील गुंतवणूक व परतावा यांचा आढावा घेतील. फंडांची वैशिष्टय़े आदींवरही त्या प्रकाश टाकतील. तर अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे ‘अर्थनियोजन महत्त्वाचे’ या विषयाशी निगडित बाबींवर भाष्य करतील. वयाच्या विविध टप्प्यांतील गुंतवणूक, आर्थिक नियोजन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी हेदेखील जोशी या कार्यक्रमात सांगतील.

  • काय? लोकसत्ता अर्थभान
  • कधी? रविवार, १७ नोव्हेंबर २०१९, सायंकाळी ६ वाजता
  • कुठे? मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई</strong>
  • मार्गदर्शक व विषय तृप्ती राणे
  •  म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ कौस्तुभ जोशी  अर्थनियोजन महत्त्वाचे