नेरुळ येथील पामबीच मार्गालगत असलेल्या अनिवासी भारतीय संकुलातील उच्चभ्रू लोकवस्तीतील काही रहिवाशांनी घरांमध्ये अंतर्गत बदल करून उंचीचा फायदा घेताना पोटमाळे बांधले आहेत. त्याच्या तक्रारी तेथील रहिवाशांनी पालिकेकडे अनेक वेळा केलेल्या आहेत. त्याची दखल पालिका घेणार असून केवळ फेरीवाल्यांबरोबर बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या श्रीमंत रहिवाशांवरदेखील जरब ठेवण्याचा संदेश देण्यासाठी एनआरआयवर लवकरच कारवाई केली जाणार आहे.

नवी मुंबईतील  एनआरआय संकुलातील ४९ ते ५६ क्रमांकाच्या इमारतीत मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेले आहे. या संकुलात अनेक शासकीय, निमशासकीय, राजकीय अधिकारी पदाधिकारी राहात आहेत. येथील बेकायदेशीर बांधकामांची तक्रार थेट येथील रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पालिकेने या घरांची तपासणी करून एक अहवाल तयार केला आहे. सिडकोने ९५च्या सुमारास खाडीकिनारी बांधलेल्या ५४ इमारतींच्या संकुलातील शेवटचे दोन मजले पेंटा हाऊस म्हणून देण्यात आलेले आहेत. या पेंटा हाऊसमधील उंची पाहता काही रहिवाशांनी त्यात एक मजला उभारला आहे. त्यामुळे खालील मजल्यावरील रहिवाशी घाबरले आहेत. अठरा मजल्याच्या या इमारतीत अशा प्रकारे बांधकाम होऊनही कार्यकारणी मूग गिळून बसली असल्याने त्याची तक्रार पालिकेकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या घरांना नोटीसा देऊन या घरांवर पालिका येत्या आठवडय़ात कारवाई करणार आहे. नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अंतर्गत बदल करणाऱ्या रहिवाशांची घरे व वाणिज्यिक गाळ्यावर कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे नवीन आयुक्त केवळ पादचारी, बैठी घरे यांच्यावरच कारवाई करीत आहेत या चर्चेला उत्तर देण्यासाठी ही कारवाई  हाती घेतली जाणार आहे.