प्रभाग आरक्षण सोडत शनिवारी; महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग नवी मुंबईतून?

नवी मुंबई : गेली अनेक दिवस थंड असलेल्या राजकीय हालचालींना शनिवारी होणाऱ्या प्रभाग आरक्षण सोडतीच्या तोंडावर वेग आला आहे. पालिकांमधील महाविकास आघाडीचा पहिला  प्रयोग नवी मुंबईतून करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भाजपाला अनुकूल बहुसदस्यीय पद्धतीचे महाविकास आघाडीने विसर्जन केल्यानंतर आता एकसदस्यीय पद्धतीने पालिकेची निवडणूक होणार आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात झालेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांच्या बैठकीत महाविकास आघाडी करण्याचा ठाम निर्णय झाला असून सर्वसाधारणपणे प्रभाग वाटपदेखील झालेले आहे. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काय होईल याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई पालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली प्रभाग, महिला, विविध जाती-जमाती आरक्षण स्थागित करून ते शनिवारी होणार आहे. सकाळी ११ वाजता विष्णुदास भावे नाटय़गृहात चक्रानुक्रमे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. काही दिग्गजांना आपल्या प्रभागावर पाणी सोडावे लागणार आहे, असल्याने सोडतीची उत्सुकता आहे.  लोकप्रतिनिधींची संख्या मात्र २०१५ च्या निवडणुकीप्रमाणेच राहणार आहे. परंतु प्रभागांचे आरक्षण मात्र नव्याने निश्चित होणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडते याकडे इच्छुकांच्या नजरा आहेत. गर्दीचा विचार करता आरक्षणाबाबतचे थेट दृश्य नाटय़गृहाबाहेरही पाहण्यासाठी मिळेल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसू लागल्याने तो सर्वच जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केला जात आहे. त्याचे काही प्रयोग जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीत यशस्वी झालेले आहेत. एप्रिलमध्ये औरंगाबाद नवी मुंबई या दोन पालिकांची निवडणूक होणार आहे. मुंबईच्या शेजारची श्रीमंत महापालिका म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जात आहे. गेली २५ वर्षे या पालिकेवर माजी मंत्री गणेश नाईक यांची सत्ता कायम आहे. ते शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेची सत्ता होती. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मोदी लाटेतही नवी मुंबई पालिका टिकवण्यात त्यांना यश आले होते. विधानसभा निवडणुकीअगोदर त्यांनी पुत्रप्रेमापोटी भाजपामध्ये प्रवेश केला, मात्र त्यांचे हे राजकीय गणित चुकल्याने आता होणाऱ्या पालिका निवडणुकीत त्यांची कसोटी लागणार आहे. यावेळेस नाईक यांची पालिकेतील सद्दी संपविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे राज्यातील महाविकास आघाडीचे पक्ष एकत्र आले असून त्यांनी आघाडी करण्याचा सध्या निर्णय घेतला आहे. या संदर्भातील सुरू झालेली जोरदार चर्चा गेली दीड महिना थंडावली होती. शनिवारच्या आरक्षणानंतर ती पुन्हा जोरात सुरू होणार असून वादग्रस्त १४ प्रभागाबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. याच वेळी राजकीय रागरंग बदललेल्या मनसेला सोबत घेऊन भाजपा अर्थात नाईक या महाविकास आघाडीचा सामना करणार आहेत. सध्या पालिकेत नाईकांची सत्ता असल्याने स्थानिक पातळीवर घेण्यात येणारे मालमत्ता तसेच कोणताही करवाढ नसलेल्या आश्वासनाची खैरात वाटली जात आहे.

निवडणूकपूर्व कार्यक्रम

शनिवार, १ फेब्रुवारी : प्रभाग आरक्षण सोडत

सोमवार, ३ फेब्रुवारी :  प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध

३ ते १० फेब्रुवारी : प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना

१२  फेब्रुवारी : हरकी व सूचनांचे विवरणपत्र सादर

चक्रानुक्रमे आरक्षण

ही प्रभाग आरक्षण सोडतीत २००५, २०१०, २०१५च्या महापालिका निवडणुकीतील आरक्षणाचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे चक्रानुक्रमे पद्धतीने आरक्षण फिरणार आहे. सलग तीन वेळा महिला प्रतिनिधी, तीन वेळा पुरुष प्रतिनिधी यांचाही आरक्षण सोडतीमध्ये विचार होणार आहे.