तीन अतिधोकादायक सोसायट्यांना परवानगी

नवी मुंबई : शासनाने नवीन बांधकाम विकास नियमावली जाहीर केल्यानंतर नवी मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गी लागत आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने तीन सोसायट्यांना परवानगी दिली

असून समितीने चार सोसायट्या यासाठी पात्र ठरविल्या आहेत. यातील नेरुळ येथील दत्तगुरू सोसायटीला रक्कम अदा केल्याने बांधकामासाठी ना-हरकत प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. परवानगी मिळालेल्या इतर दोन सोसायट्यांमध्ये वाशी सेक्टर १० येथील श्रद्धा को.सोसायटी व एकता सोसायटीचा समावेश आहे. मात्र त्यांनी रक्कम अदा न केल्याने त्यांना अद्याप बांधकाम परवानगी दिलेली नाही.

नवी मुंबईतही धोकादायक इमारतींचा प्रश्न जटिल होत आहे. पालिकेने ३० वर्षांअगोदच्या बांधकाम केलेल्या इमारतींच्या सर्वेक्षणात ४५७ इमारती या धोकादायक आढळून आल्या असून यात ६१ इमारती या अतिधोकादायक आहेत. त्या इमारती वापरण्यायोग्य नसतानाही प्रशासन काहीच धोरण राबवत नसल्याने जायचे कुठे? म्हणून याच इमारतीत वास्तव्य करीत आहेत. अशा  वापरण्या अयोग्य ४७ इमारतींत नागरिक राहत आहेत. उद्याची सकाळ कशी उजडेल या चिंतेत ते रात्री झोपत आहेत. त्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासाची गरज निर्माण झाली आहे. मात्र हा पुनर्विकासाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.

नुकतीच राज्य शासनाने नवीन बांधकाम विकास नियमावली लागू केली असून यात नवी मुंबईतील या इमारतींच्या पुनर्विकासासाठी तीन वाढीव चटई निर्देशांक मिळणार आहे. यात शुल्क भरून अगदी वाढीव पाच चटई निर्देशांकही घेता येणार आहे. त्यानंतर शहरातील रखडलेल्या या पुनर्विकासालाही गती मिळत आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने नुकतेच शहरातील तीन अशा सोसायट्यांना पुनर्विकासाला परवानगी दिली आहे. यात नेरुळ येथील दत्तगुरू या सोसायटीने रक्कमही आदा केल्याने त्यांना बांधकामाची मंजुरीही देण्यात आली आहे. या तीन सोसायट्यांना २.५ चटई निर्देशांक मिळणार आहे. मात्र शासनाच्या नवीन नियमावालीनुसार त्यांनी अर्ज केल्यास त्यांना वाढीव चटई निर्देशांकाचा फायदाही मिळणार आहे.

पुनर्विकासासाठी पात्र ठरविण्यासाठी पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. यात सिडकोचे मुख्य नियोजनकार, सिडकोचे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणेचे अधीक्षक अभियंता, कोकण विभागीय नगररचना विभागाचे सहसंचालक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता यांचा समावेश आहे. अतिधोकादायक असलेल्या ‘सी वन’ प्रवर्गात घोषित इमारतींच्या पुनर्विकासाकरिता सादर प्रस्तावांच्या अनुषंगाने तेथील रहिवाशांकडून मागणी केल्यानंतर ही समिती पाहणी करून त्या प्रस्तावाला मंजुरी देते. १५ व १७ डिसेंबर रोजी दाखल प्रस्तावांची स्थळ पाहणी करीत आणखी चार सोसायट्या पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनी पुढील प्रक्रिया पार केल्यास त्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न निकाली निघणार आहे.

आणखी चार सोसायट्या पुनर्विकासासाठी समितीने पात्र ठरविल्या आहेत. त्यांना नवीन बांधकाम नियमावलीनुसार त्या ३ चटई निर्देशांकानुसार प्रस्ताव सादर करू शकणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

परवानगी मिळालेल्या सोसायट्या

  •  दत्तगुरू सोसायटी, नेरुळ
  •   श्रद्धा को.सोसायटी, वाशी
  •  एकता को.सोसायटी, वाशी

पात्र ठरलेल्या सोसायट्या

  •  निवास्ती, सेक्टर २ वाशी
  •  लिटिल फ्लावर, सेक्टर ९ वाशी
  •  उत्कर्ष ६१,६२,६३, सेक्टर ९ वाशी
  •  पंचशील, सेक्टर-२ नेरुळ

४५७ – शहरात धोकादायक इमारती

६१ – अतिधोकादायक इमारती

४७ – धोकादायक इमारतींचा वापर सुरू