बेलापूर ते पेंदार मेट्रो सेवा दृष्टिक्षेपात

नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोच्या कामावर महामेट्रोचे अभियंता देखरेख करीत असून मेट्रो सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल महामेट्रो करणार असल्याने रखडलेला हा प्रकल्प आता वेळेत पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित झाल्यास दक्षिण नवी मुंबईतील खारघर, तळोजा, कळंबोली, पनवेल, कामोठे या सिडको नोडच्या विकासाला गती मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

सिडकोने दक्षिण व उत्तर नवी मुंबईत चार मेट्रो मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यातील पहिल्या ११ किलोमीटरच्या बेलापूर ते पेंदार या मार्गाचे काम मे २०११मध्ये सुरू करण्यात आले. जमीन ही सिडकोच्या ताब्यात असल्याने तो प्रमुख अडचण दूर झाली होती. त्यामुळे हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होईल असा विश्वास त्यावेळी सिडकोने व्यक्त केला होता. मात्र कंत्राटदार आणि सिडको यात कामावरून खटके उडाले. एक कंत्राटदाराचे प्रकरण तर मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने हा प्रकल्प चांगलाच रखडला. चार वर्षांने सुरू होणारी ही सेवा दहा वर्षे झाली तरी सुरू झाली नाही.

मेट्रोसारखी सुविधा चार वर्षांत सुरू होणार असल्याने अनेक नागरिकांनी या भागात घरे घेण्याचा सपाटा लावला होता, पण प्रकल्प रखडल्याने रहिवाशांची निराशा झाली होती.

आता रखडेलेले हे काम मार्गी लागावे यासाठी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पासाठी महामेट्रोच्या अभियंत्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे हे काम आता लवकर पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली असून येत्या सहा महिन्यांत हा मार्ग सुरू होणार असल्याची चर्चा आहे. वाहतुकीचे उत्तम साधन असलेले मेट्रो सुरू झाल्यानंतर या दक्षिण

भागाचा विकासाला चालना मिळणार आहे. येथील बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस येण्याची शक्यता असून हा भाग आर्थिक विकासाचे केंद्र होणार आहे.

नवी मुंबई मेट्रो येणार अशी गेली अनेक वर्षे केवळ प्रतीक्षा होती. ती आता महामेट्रोकडे परिचालन व देखभालचे काम दिल्याने हा मार्ग दृष्टिक्षेपात आला आहे. मेट्रो हा शहर विकासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या या दक्षिण भागाच्या विकासाला मेट्रोमुळे चालना मिळणार आहे. सिडकोच्या या प्रयत्नाचे स्वागत आहे.

प्रकाश बावीस्कर, अध्यक्ष, क्रेडाई, नवी मुंबई</strong>