नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकीला वेगात आलेल्या सीडान कारने जोरदार धडक दिली. या दुर्देवी अपघातात ललिता पाटील (५५) आणि त्यांचा ३५ वर्षांचा मुलगा अमोल पाटील यांचा मृत्यू झाला. अपघाताच्यावेळी या कुटुंबासोबत त्यांची छोटी नातही होती.

पाम बीच रोडच्या पुढे असलेल्या सेक्टर ४६ अ मधील सर्व्हीस रोडवर सोमवार रात्री ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून आई आणि मुलगा दोघे बोलत असताना वेगात आलेल्या सीडान कारने जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या अमोलचा जागीच मृत्यू झाला तर ललिता पाटील यांना बेलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. सीडान कार चालवणारा आमीर अन्सारीला (२१) अपघात स्थळावरुन अटक करण्यात आली आहे. आमीर अन्सारी बेदरकारपणे वाहन चालवत असताना त्याने स्कूटरला धडक दिली. अपघाताच्यावेळी अमोल पाटील स्कूटरवर बसलेले होते तर त्याची आई उभी राहून त्याच्याशी बोलत होती. सुदैवाने अमोल पाटील यांची छोटी मुलगी या भीषण अपघातातून बचावली. तिला फक्त थोडसं खरचटलं.